कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी अक्कलकोटला द्या!
अक्कलकोटसाठी पाच टीएमसी पाण्याची आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) : अक्कलकोट तालुक्यातील पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी निरा-भीमा खोऱ्याकडे वळविण्याच्या प्रस्तावित योजनेतून अक्कलकोटसाठी पाच टीएमसी पाणी मंजूर करावे, अशी मागणी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या मागणीच्या अनुषंगाने भीमा नदीवरील उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला द्यावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
सांगली शहर आणि परिसरात दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कृष्णा नदीतील सुमारे ५० टीएमसी अतिरिक्त पाणी निरा-भीमा खोऱ्याकडे वळविण्याची योजना प्रस्तावित आहे. या योजनेचा लाभ अक्कलकोट तालुक्याला मिळाल्यास दुष्काळग्रस्त भागातील शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होऊ शकते. यासाठी आमदार कल्याणशेट्टी यांनी पुढाकार घेत अक्कलकोटसाठी स्वतंत्र पाण्याची तरतूद करण्याची मागणी केली आहे.
अक्कलकोट तालुका कायमस्वरूपी दुष्काळप्रवण क्षेत्रात येत असल्याने येथे शेतीसाठी पाण्याची समस्या सातत्याने जाणवते. तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या विविध लहान-मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्ये दरवर्षी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत नाही. परिणामी, मंजूर पाणी वापरानुसारही शेतकऱ्यांना आवश्यक तेवढे पाणी मिळत नसल्याने शेती उत्पादनावर आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर प्रतिकूल परिणाम होत आहे.
या पार्श्वभूमीवर भीमा नदीत उपलब्ध होणाऱ्या पुराच्या पाण्यातून पाच टीएमसी पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे उचलून अक्कलकोट तालुक्यातील पाण्याची कमतरता असलेल्या सिंचन प्रकल्पांमध्ये सोडण्यात यावे, अशी भूमिका कल्याणशेट्टी यांनी मांडली आहे. पावसाळ्यात या प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाल्यास त्याचा उपयोग शेतीसाठी करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना मंजूर पाणी वापराचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यावर भर
कृष्णा खोऱ्यातील एकूण मंजूर पाणी वापरात वाढ न करता, उपलब्ध पाण्याचा अधिक कार्यक्षमतेने उपयोग करून अक्कलकोटसारख्या दुष्काळी भागाला दिलासा देता येऊ शकतो, असेही आमदार कल्याणशेट्टी यांनी पत्रात नमूद केले आहे.
आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा विभाग या मागणीवर काय निर्णय घेतात, तसेच सर्वेक्षण आणि डीपीआर तयार करण्याच्या प्रक्रियेला कधी सुरुवात होते, याकडे अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. ही योजना प्रत्यक्षात साकार झाल्यास तालुक्यातील सिंचन व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.
.jpg)
No comments:
Post a Comment