महाराष्ट्रात तब्बल २ कोटी मतदार वगळले; नवी यादी जाहीर
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ‘एसआयआर’पूर्वी राज्यात ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदार होते. प्रारूप यादीत त्यापैकी ७ कोटी ७१ लाख ६५ हजार ५६२ मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. यात ३ कोटी ९५ लाख ८९ हजार ९०५ पुरुष, ३ कोटी ७५ लाख ७२ हजार ५७० महिला आणि ३ हजार ८७ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
वगळलेल्या मतदारांच्या जिल्हानिहाय आकडेवारीत पुणे जिल्हा आघाडीवर असून, तिथे २८ लाख ६६ हजार ४८१ मतदारांचे गणना अर्ज प्राप्त झालेले नाहीत. त्यापाठोपाठ ठाणे २८ लाख ५९ हजार ३७७, मुंबई उपनगर २६ लाख ५८ हजार २०२ आणि नागपूर १४ लाख ४३ हजार २६७ अशी आकडेवारी आहे. नाशिकमध्ये १० लाख २७ हजार ७९२, मुंबई शहरात ९ लाख ५० हजार ७२०, पालघरमध्ये ६ लाख ६८ हजार ७०९ आणि सोलापूरमध्ये ६ लाख २२ हजार ६७१ मतदारांचा समावेश या गटात आहे. विशेष म्हणजे पुणे, ठाणे आणि मुंबई उपनगर या तीन जिल्ह्यांत मिळून ८३ लाख ८४ हजारांहून अधिक मतदारांचे गणना अर्ज प्राप्त झालेले नाहीत.
यादीत नाव नसेल तर काय करावं लागणार?
प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ३० सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. प्रारूप यादीत पात्र नाव नसेल तर नमुना ६ व घोषणापत्र भरून नाव समाविष्ट करण्याची मागणी करता येईल. यादीतील एखाद्या नावावर आक्षेप असल्यास नमुना ७, तर नाव, पत्ता, वय, लिंग आदी तपशीलात दुरुस्ती करण्यासाठी नमुना ८ भरता येईल. तसेच यादीत नाव असले, परंतु २००२-०४च्या मतदारयादीतील नोंदीशी जुळवणी न झालेल्या किंवा जुळवणी झाली असली तरी तार्किक विसंगती आढळलेल्या मतदारांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत.
दिल्लीत काय आहे स्थिती?
दिल्लीत मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पडताळणीची (एसआयआर) प्रक्रिया राष्ट्रीय निवडणूक आयोगाने पूर्ण केली असून, प्रारूप मतदारयादी सोमवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार या यादीतून सुमारे ४८ लाख मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाले. दिल्लीत आता केवळ ९७ लाख ५३ हजार ५७७ मतदार आहेत. नवीन यादीनुसार मागील वर्षाच्या तुलनेत मतदारांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून, दोन कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या राष्ट्रीय राजधानीत आता एक कोटींपेक्षा कमी मतदार आहेत. चार नोव्हेंबरला दिल्लीची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
.png)
No comments:
Post a Comment