मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नात होते पालखी महामार्गावर रस्ता रोको
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनास समर्थन देण्यासाठी माळशिरस तालुक्यातील समस्त मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी (दि. १०) नातेपुते येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौकात पालखी महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या या आंदोलनास तालुक्यातील विविध गावांमधून मराठा बांधवांची मोठी उपस्थिती होती.मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन त्या मान्य कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनानंतर मराठा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.नातेपुतेसह माळशिरस तालुक्यातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने मराठा बांधव आंदोलनस्थळी दाखल झाले होते. तसेच इतर समाजातील नागरिकांनीही आंदोलनाला पाठिंबा देत उपस्थिती दर्शविली. आरक्षणाच्या मागणीसाठी एकजुटीने आवाज उठवत आंदोलकांनी शासनाचे लक्ष वेधले.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस प्रशासनाच्या बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले.यावेळी शरद बापू मोरे, सुशांत पाटील, माऊली देशमुख, राजदीप देशमुख, वैभव मोरे, तेजस मोरे, सचिन पवार, प्रणव थोरात, डॉ. थोरात, हनुमंत साळुंखे, सोमनाथ वाघ, सचिन जाधव, प्रणिल देशमुख, सुधीर मोरे, उद्धव सावंत, संदीप सावंत, एपीआय विशाल वायकर, सालगुडे पाटील, बाबा पोळ, दीपक माने, आकाश साळुंखे, सतीश निकम, बाळासाहेब निकम, दादासाहेब कदम, सुहास देशमुख व प्रताप साळुंखे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व मराठा समाजबांधव उपस्थित होते.मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या या रस्ता रोको आंदोलनाला माळशिरस तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
No comments:
Post a Comment