राजकीय कटुतेला थारा न देता जनसेवेचा मार्ग स्वीकारला : लक्ष्मण तात्या धनवडे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 14, 2026

राजकीय कटुतेला थारा न देता जनसेवेचा मार्ग स्वीकारला : लक्ष्मण तात्या धनवडे

 राजकीय कटुतेला थारा न देता जनसेवेचा मार्ग स्वीकारला : लक्ष्मण तात्या धनवडे


(परिचारकांच्या विचारांचा वारसा जपत ग्रामविकासासाठी सातत्याने कार्यरत)
तुंगत (कटूसत्य वृत्त):- कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकी, विकासाभिमुख विचारांचा वारसा पुढे नेताना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सातत्याने बळ आणि मार्गदर्शन दिले. त्यामुळे ग्रामपातळीवर काम करताना कोणतीही राजकीय कटुता मनात न ठेवता सर्वसामान्य जनतेची कामे करण्याचा प्रयत्न केला. आज वाढदिवसानिमित्त नारायण चिंचोली व भैरवनाथवाडी परिसरातील ग्रामस्थांनी प्रेम, आपुलकी आणि आशीर्वादरूपी केलेला सन्मान ही माझ्यासाठी मोठी कमाई असून, या ऋणातून कधीही उतराई होता येणार नाही, असे भावनिक प्रतिपादन कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण तात्या धनवडे यांनी केले.
नारायण चिंचोली व भैरवनाथवाडी ग्रामस्थांच्या वतीने लक्ष्मण तात्या धनवडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील ग्रामस्थ, युवक, ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना धनवडे म्हणाले की, सामान्य कुटुंबातून पुढे येताना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही परिसरातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला. ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि तरुण कार्यकर्त्यांची साथ यामुळेच आजपर्यंतचा प्रवास घडत गेला. माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत, विविध सहकारी संस्था तसेच श्री सूर्यनारायण देवस्थानच्या माध्यमातून परिसराच्या विकासासाठी काम करण्याची संधी मिळाली.
गावपातळीवरील राजकारण करताना मतभेद असू शकतात; मात्र मनभेद आणि राजकीय कटुता निर्माण होऊ नये, ही भूमिका आपण कायम ठेवली असल्याचे धनवडे यांनी स्पष्ट केले. विकासाच्या कामात राजकीय मतभेद बाजूला ठेवून गावातील सर्व घटकांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच आज विविध विचारांचे ग्रामस्थ आपुलकीने वाढदिवसानिमित्त एकत्र आले, हीच आपल्या कामाची खरी पावती असल्याचे त्यांनी सांगितले.
परिसरातील युवक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी दिलेली साथ आणि ज्येष्ठांनी दिलेले मार्गदर्शन ही आपली मोठी ताकद आहे. ग्रामविकासाच्या कामात युवकांचा सहभाग वाढला पाहिजे. गावातील प्रश्न सोडविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न केले, तर विकासाची गती निश्चितच वाढू शकते, असेही धनवडे यांनी सांगितले. वाढदिवसानिमित्त आयोजित सामाजिक उपक्रमांमुळे कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकीची किनार लाभली. केवळ वाढदिवसाचा सोहळा न करता समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून तो साजरा करण्याची ग्रामस्थांची भूमिका विशेष ठरली.
शेवटी धनवडे यांनी नारायण चिंचोली, भैरवनाथवाडी तसेच परिसरातील ग्रामस्थांचे आभार मानत, “आजपर्यंत ज्याप्रमाणे आपले प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद मिळाले, त्याचप्रमाणे भविष्यातही आपले आशीर्वाद कायम पाठीशी राहावेत. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता विकास आणि जनसेवेचे काम पुढे सुरू ठेवू,” अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमास परिसरातील ग्रामस्थ, युवक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages