१५ व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपाची चौकशी करा!
मोहोळ पंचायत समितीसमोरील बेमुदत उपोषणाला भेट; निधी वाटपात भेदभाव नको, समान न्यायाची मागणी
मोहोळ (कटूसत्य वृत्त) : मोहोळ पंचायत समिती कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी पंचायत समिती सदस्यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणस्थळी आमदार राजू खरे यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांशी सविस्तर संवाद साधण्यात आला. १५ व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपाची सखोल व जलदगतीने चौकशी करावी, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत मंजूर निधीच्या वाटपाला स्थगिती द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्ते गटनेते व पंचायत समिती सदस्य बाळासाहेब गायकवाड यांनी केली.
उपोषणकर्त्यांनी निधी वाटपाच्या प्रक्रियेबाबत उपस्थित केलेले आक्षेप व त्यांच्या मागण्या आमदार राजू खरे यांनी जाणून घेतल्यानंतर या विषयासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करण्यात आली. आंदोलनकर्त्यांच्या भावना आणि त्यांच्या मागण्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.
१५ व्या वित्त आयोगाचा निधी हा गावांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी उपलब्ध होणारा सार्वजनिक निधी आहे. त्यामुळे त्याच्या वाटपात नियमांचे पालन होऊन सर्व संबंधित गावांना न्याय्य व पारदर्शक पद्धतीने निधी मिळणे आवश्यक आहे, अशी स्पष्ट भूमिका यावेळी आमदार राजू खरे यांनी मांडली.
निधी वाटपाच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप किंवा भेदभाव होता कामा नये. विकासाचा निधी हा कोणत्याही व्यक्तीच्या किंवा गटाच्या मर्जीचा विषय नसून तो जनतेच्या हक्काचा आहे. त्यामुळे निधी वाटप पारदर्शक, नियमबद्ध आणि लोकहिताच्या निकषांवरच झाले पाहिजे, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केलेल्या आरोपांची सक्षम यंत्रणेमार्फत वस्तुनिष्ठ चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी. चौकशीत अनियमितता किंवा दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.
मोहोळ तालुक्याच्या विकासासाठी मिळणाऱ्या निधीच्या प्रत्येक रुपयाचा विनियोग जनतेच्या हितासाठी झाला पाहिजे. निधी वाटपात कोणताही भेदभाव सहन केला जाणार नाही, अशी भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली. या प्रश्नावर पुढील काळातही सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासनही आमदार राजू खरे यांनी दिले.
मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण हे आंदोलन चालूच राहणार असल्याचा इशारा उपोषणकर्ते पंचायत समिती सदस्य डॉ. अमित व्यवहारे, पंचायत समिती सदस्य गणेश मुळे, पंचायत समिती सदस्य संगीत वसेकर यांनी दिला.
यावेळी संजय अण्णा क्षीरसागर, सौदागर साठे, दीपक गवळी, सुनील पाटील, विनोद कांबळे, पद्माकर अप्पा देशमुख, सतीश पाटील, राहुल व्यवहारे, नवनाथ आवारे, चंद्रकांत निकम, राजू गूंड, दमणी अण्णा गोडसे, डॉ. झेंडगे, बंडू मामा मुळे, देविदास चव्हाण आदी आंदोलनकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment