सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ऑटोमेट इंजिनिअरिंगशी सामंजस्य करार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षण, प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण आणि रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सोलापूर आणि पुणे येथील ऑटोमेट इंजिनिअरिंग यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागांचा या करारात सहभाग आहे.
या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यपद्धती समजून घेण्याची संधी मिळणार आहे. ऑटोमेट इंजिनिअरिंगकडून उद्योगांच्या गरजांनुसार अभ्यासक्रम व प्रशिक्षण पद्धतीसाठी आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी औद्योगिक भेटी, प्रशिक्षण कार्यक्रम, कौशल्य विकास उपक्रम, तज्ज्ञांची व्याख्याने आणि फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यास सहकार्य केले जाणार आहे.
विशेषतः PLC, SCADA, Automation, IoT आणि Industrial IoT यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर संयुक्त संशोधन, कार्यशाळा आणि प्रशिक्षण घेण्यावर करारात भर देण्यात आला आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वर्ग प्रशिक्षणाबरोबरच प्रकल्पाधारित प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष औद्योगिक प्रकल्पांवर काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
करारानुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील नऱ्हे इंडस्ट्रियल इस्टेट आणि कंपनीच्या प्रकल्प विभागांमध्ये सहा महिन्यांची पूर्णवेळ इंटर्नशिप करण्याची तरतूद आहे. इंटर्नशिप आणि प्लेसमेंटसाठी AICTE, विद्यापीठ तसेच व्यवस्थापनाच्या लागू नियमांनुसार सहकार्य करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक ज्ञान आणि उद्योगांच्या प्रत्यक्ष अपेक्षा यातील कौशल्य अंतर कमी करण्यास मदत होणार आहे.
महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. एस. डी. नवले, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख डॉ. एस. एस. शिरगण, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख डॉ. व्ही. एस. बिरादार, तर ऑटोमेट इंजिनिअरिंगच्या वतीने इन्स्टिट्यूट-इंडस्ट्री कोलॅबोरेशनचे संचालक अखिलेश देव यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख आणि रोजगारक्षम बनविण्यावर सिंहगड इन्स्टिट्यूटचा सातत्याने भर असून, ऑटोमेट इंजिनिअरिंगसोबत झालेला हा सामंजस्य करार त्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
या उद्योग–शैक्षणिक सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, औद्योगिक वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव, इंटर्नशिप तसेच रोजगारक्षम कौशल्ये विकसित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

No comments:
Post a Comment