नातेपुत येथील आझाद गणेशोत्सव मंडळातर्फे शाडूच्या गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळाचे आयोजन,
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी साकारल्या सुबक गणेशमूर्ती
नातेपुते(कटूसत्य वृत्त):- आझाद गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन आझाद चौक येथील समाज मंदिरात करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यशाळेत नातेपुते येथील अक्षय शिक्षण संस्था, एस.एन.डी. इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील प्रशाला तसेच ओपन या विविध शैक्षणिक संस्थांमधील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीचा वापर करून विविध आकारांच्या आकर्षक व सुबक गणेशमूर्ती स्वतःच्या कल्पकतेतून साकारल्या. मूर्ती बनविताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह आणि आनंद विशेष लक्षवेधी ठरला.
कार्यशाळेचे उद्घाटन रणवीर देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना रणवीर देशमुख म्हणाले, “गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उत्सव झाला पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्वतः शाडूच्या मातीच्या मूर्ती तयार करून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची सुंदर सुरुवात केली आहे.”
या कार्यशाळेचे परीक्षक म्हणून राहुल बोराटे यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणेशमूर्तींचे परीक्षण करून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमास सुखदेव वलेकर, मनोज राऊत, बरडकर, गुजर, दीक्षित, अश्विन, उमेश पोतदार तसेच आझाद गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती निर्मितीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश जनमानसात पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

No comments:
Post a Comment