भोसले वस्ती येथे श्री गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 15, 2026

भोसले वस्ती येथे श्री गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन

 भोसले वस्ती येथे श्री गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-  टेंभुर्णीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर चव्हाणवाडी रस्त्यालगत भोसले वस्ती येथे असलेल्या श्री गजानन महाराज मंदिरात श्रींच्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यतिथीनिमित्त मंदिरात श्री गजानन महाराजांची विधिवत पूजा-अर्चा, आरती, नामस्मरण व धार्मिक कार्यक्रम होणार असून परिसरातील भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. संत श्री गजानन महाराजांची पुण्यतिथी ऋषिपंचमीच्या दिवशी साजरी केली जाते. महाराजांनी भक्तांना भक्तीमार्गावर राहण्याचा संदेश दिला असून त्यांच्या जीवनचरित्राचा उल्लेख संतकवी दासगणू महाराज लिखित ‘श्री गजानन विजय’ या ग्रंथात आढळतो. महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या भक्तांमध्ये विशेष भक्तिभावाचे वातावरण निर्माण होते. यावेळी “गण गण गणात बोते” या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमणार असून श्रींच्या चरणी भाविकांकडून श्रद्धा व भक्तिभावाने नतमस्तक होऊन प्रार्थना करण्यात येणार आहे. महाराजांचे भक्तांना दिलेले वचनही यावेळी स्मरणात ठेवले जाते—“मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका; कदा मजलागी विसरू नका, मी आहे येथेच.” 
या धार्मिक कार्यक्रमानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील सर्व भाविकांनी कुटुंबासह उपस्थित राहून श्री गजानन महाराजांचे दर्शन घ्यावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराच्या पुजारी सौ कुसुम हनुमंत गायकवाड यांनी केले आहे. “गण गण गणात बोते, श्री गजानन महाराज की जय” या जयघोषात पुण्यतिथी सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. मंदिर परिसरात भाविकांच्या स्वागतासाठी आवश्यक तयारी करण्यात आली असून चव्हाणवाडी रोड, भोसले वस्ती तसेच टेंभुर्णी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages