तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सिंहगड पब्लिक स्कूल उपविजेते - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 26, 2026

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सिंहगड पब्लिक स्कूल उपविजेते

 तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सिंहगड पब्लिक स्कूल उपविजेते



सोलापूर (कटूसत्य वृत्त):-   पाकणी, उत्तर सोलापूर येथे आयोजित तालुकास्तरीय १४ वर्षांखालील मुलांच्या कबड्डी स्पर्धेत सिंहगड पब्लिक स्कूल, केगाव, सोलापूरच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. साखळी सामन्यापासून अंतिम फेरीपर्यंत सातत्यपूर्ण खेळ करत संघाने आपल्या क्रीडा कौशल्याची छाप पाडली.

स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सिंहगड पब्लिक स्कूलने आदर्श मार्कंडे विद्यालयावर ३४-३ असा दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत महात्मा गांधी विद्यालयाचा ३०-१४ असा पराभव करून संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य सामन्यात जे. बी. घोडके, नलंज संघावर ३५-१८ अशी मात करत सिंहगडने अंतिम फेरी गाठली.

अंतिम सामन्यात सिंहगड पब्लिक स्कूल आणि हर्षवर्धन हायस्कूल यांच्यात अटीतटीची लढत झाली. दोन्ही संघांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. अखेर हर्षवर्धन हायस्कूलने २५-२१ अशा अवघ्या चार गुणांच्या फरकाने विजय मिळवला. त्यामुळे सिंहगड पब्लिक स्कूलला उपविजेतेपद मिळाले.

संपूर्ण स्पर्धेत सिंहगडच्या खेळाडूंनी प्रभावी चढाया, भक्कम बचाव, अचूक पकडी आणि उत्तम सांघिक समन्वयाच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली. तालुकास्तरीय स्पर्धेतील या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

संघाच्या यशाबद्दल सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव तथा सिंहगड इन्स्टिट्यूट्स, केगाव, सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर  संजय नवले यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळाडूंनी स्पर्धेत दाखविलेली जिद्द, शिस्त, सांघिक भावना आणि खेळातील सातत्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. या यशामुळे खेळाडूंना पुढील स्पर्धांसाठी अधिक आत्मविश्वास व प्रेरणा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संघाला क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक राजू ठाकुर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मुख्याध्यापिका शाहीन शेख, उपमुख्याध्यापक प्रकाश नवले, उपमुख्याध्यापिका निकहत शेख यांच्यासह शिक्षकवृंद व पालकांनी खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन करून पुढील जिल्हा, विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages