गडचिरोली ग्रीन स्टीलचे जागतिक केंद्र म्हणून विकसित होणार – मंत्री जयकुमार रावल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 4, 2026

गडचिरोली ग्रीन स्टीलचे जागतिक केंद्र म्हणून विकसित होणार – मंत्री जयकुमार रावल

 

गडचिरोली ग्रीन स्टीलचे जागतिक केंद्र म्हणून विकसित होणार – मंत्री जयकुमार रावल




मुंबई (कटूसत्य वृत्त):-  महाराष्ट्राच्या औद्योगिक भविष्यास नवी दिशा देणारा आणि शाश्वत औद्योगिकीकरणाला चालना देणारा महत्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे. जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेडसोबत करण्यात आलेला सामंजस्य करार हा केवळ औद्योगिक गुंतवणुकीचा करार नसून गडचिरोलीला ग्रीन स्टील उत्पादनाचे जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या महत्वाकांक्षी संकल्पाचा पाया असल्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

या करारासंदर्भात आयोजित बैठकीत जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, डॉ. फ्रेडरिक मार्टिन, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगन, राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे आदी उपस्थित होते.

यावेळी पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली महाराष्ट्र हे जागतिक गुंतवणूक, अत्याधुनिक तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि शाश्वत औद्योगिक विकासाला चालना देणारे अव्वल राज्य आहे. राज्याचा विकास हा केवळ आर्थिक वाढीपुरता मर्यादित नसून सर्वसमावेशक आणि संतुलित प्रादेशिक विकासावर आधारित आहे. गडचिरोलीतील हा उपक्रम केवळ नवीन उद्योग उभारण्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण जिल्ह्याच्या औद्योगिक परिवर्तनाचा पाया ठरेल. या प्रकल्पामुळे अत्याधुनिक हरित तंत्रज्ञान, मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि स्थानिक युवकांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. विदर्भातील नैसर्गिक व खनिज संपत्तीला पर्यावरणपूरक उत्पादन प्रक्रियेची जोड देत जबाबदार औद्योगिक विकासाचे आदर्श मॉडेल उभारले जाईल.

पणन मंत्री रावल म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणूक व प्रवासी भारतीय संपर्क विभागाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय औद्योगिक भागीदारी अधिक मजबूत करण्यात येत आहे. जॉन कॉकरिलसोबतची ही भागीदारी राज्याला हरित पोलाद उत्पादन आणि निर्यातीसाठी जागतिक स्तरावर नवे स्थान मिळवून देईल.

४ सप्टेंबर रोजी बेल्जियमचे पंतप्रधान यांच्या उपस्थितीत या सामंजस्य कराराची औपचारिक देवाणघेवाण होणार असून, या सहकार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे बळ आणि प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हरित औद्योगिक विकासाला जागतिक मान्यता मिळण्यास मोठी मदत होईल.

शासनाकडून या प्रकल्पासाठी आवश्यक सर्व परवानग्या, धोरणात्मक प्रोत्साहन, सुलभ सुविधा आणि उद्योगपूरक परिसंस्था उपलब्ध करून देण्यात येणार असून स्थानिक युवकांच्या कौशल्य विकासावर विशेष भर दिला जाणार असल्याचेही मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले. गडचिरोलीची ओळख केवळ नैसर्गिक संपत्तीपुरती मर्यादित न राहता ती ग्रीन स्टील, नवोपक्रम आणि शाश्वत उद्योगांचे जागतिक केंद्र म्हणून निर्माण व्हावी, ही राज्य शासनाची स्पष्ट दृष्टी आहे. महाराष्ट्र नैसर्गिक संसाधनांपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाकडे, पारंपरिक उद्योगांपासून हरित उद्योगांकडे आणि देशांतर्गत उत्पादनापासून जागतिक निर्यातक्षमतेकडे वाटचाल करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे, असे यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेडचे महाराष्ट्रावर विश्वास दाखवल्याबद्दल आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages