आहार, विहार, निद्रा ही त्रिसूत्री उत्तम असेल तर जीवनशैली उत्तम : डॉ. शेंडगे
मनोरमा मल्टिस्टेटतर्फे जीवनशैली व आहारावर व्याख्यान
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आहार, विहार आणि निद्रा या त्रिसूत्रीचा योग्य पद्धतीने अवलंब केल्यास जीवनशैली निरोगी राहण्यास मदत होते. बैठे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विशेषतः आहाराच्या वेळा, व्यायाम आणि पुरेशी झोप याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शिळे अन्न टाळावे, सकाळचा नाश्ता पौष्टिक असावा आणि जेवणाच्या वेळा नियमित ठेवाव्यात, असे मार्गदर्शन डॉ. विद्या शेंडगे यांनी केले.
मनोरमा पावन गणपती पूजनिमित्त मनोरमा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीतर्फे जीवनशैली व आहार या विषयावर मनोरमा सांस्कृतिक भवन येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मल्टिस्टेटच्या चेअरमन शोभा मोरे होत्या. व्यासपीठावर बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे, डॉ. सत्यजित वाघचवरे, डॉ. शुभांगी वाघचवरे आणि सीईओ शिल्पा कुलकर्णी उपस्थित होते.
रात्रीचे जेवण शक्यतो सात वाजेपर्यंत करावे. रात्री हलका आहार घ्यावा. जेवणानंतर किमान १५ मिनिटे शतपावली करावी. पुरेशी झोप घेतल्यास आरोग्याच्या अनेक समस्या टाळण्यास मदत होते. पावसाळ्यात पालेभाज्या, ऋतुनुसार फळे आणि सॅलडचा आहारात समावेश करावा. जंकफूड शक्यतो टाळावे, असा सल्ला डॉ. शेंडगे यांनी दिला.
सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी, दुपारी कोकम सरबत तसेच काकडी, टोमॅटो, गाजर, बीट यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. बदाम, अक्रोड, अंजीर, भोपळ्याच्या बिया यांसारखे नट्स आणि सीड्सही आहाराचा भाग असावेत. ऋतू बदलला की आहारातही बदल करावा. आपल्या प्रकृतीनुसार आहार निश्चित करणे गरजेचे आहे. ‘आपला आहारच आपले औषध आहे,’ असेही त्यांनी सांगितले.जेवताना मोबाईल किंवा टीव्ही पाहणे टाळावे. स्क्रीनटाइम कमी करावा. दररोज स्वतःसाठी किमान ३० मिनिटे देऊन स्ट्रेचिंग, डोळ्यांचे व्यायाम आणि पायांच्या बोटांवर चालण्यासारखे व्यायाम करावेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. सत्यजित वाघचवरे आणि डॉ. शुभांगी वाघचवरे यांनी दातांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले. प्रारंभी शिल्पा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. विद्या भगरे-भोसले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास मनोरमा मल्टिस्टेटच्या शाखांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment