‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत राजस्व नगर येथे महिला सुरक्षा व कल्याणकारी योजनांची माहिती
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या सेवांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ‘लोकसंवाद २०२६’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत राजस्व नगर सहकारी गृहनिर्माण संस्था येथील गणेश मंडळामध्ये महिला विषयक कल्याणकारी योजना तसेच महिला सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी महानगरपालिकेच्या महिला बचत गटाचे समन्वयक समीर मुलानी यांनी महिलांसाठीच्या विविध शासकीय योजना, महिला बचत गटांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या संधी तसेच महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपलब्ध असलेल्या उपाययोजना आणि सुविधांबाबत मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांचा लाभ पात्र महिलांनी घ्यावा, तसेच उपलब्ध सुविधांची माहिती इतर महिलांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
महिला प्रतिनिधींचा सहभाग
लोकसंवाद उपक्रमाच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमास राजस्व न
गर सहकारी गृहनिर्माण संस्था मंडळाच्या महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. यावेळी उर्मिला शिवाजी बचुटे, प्रतिभा कुलकर्णी, दीपा रजपूत, मंगल हंचनाळे, विजया हंचनाळे, उत्तरा बचुटे आणि नागेश बेळगी यांची उपस्थिती होती.
महिलांच्या सहभागातून शासनाच्या योजना, महिला सक्षमीकरण आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांची माहिती समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यास मदत होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
‘लोकसंवाद २०२६’चा उद्देश नागरिकांपर्यंत पोहोचविला
जिल्हा माहिती कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक मिलिंद भिंगारे यांनी ‘लोकसंवाद २०२६’ या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
गणेशोत्सवातील विविध उपक्रम, सामाजिक संदेश, सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच गणेशमूर्तींची माहिती डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी ‘बाप्पा डॉट ओआरजी’ या माध्यमाचा वापर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
गणेश मंडळांनी तसेच घरगुती गणपती उत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांनी गणेशोत्सवाशी संबंधित व्हिडिओ, रील्स आणि छायाचित्रे ‘बाप्पा डॉट ओआरजी’वर अपलोड करून गणेशोत्सवाचा डिजिटल ठेवा निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील गणेशोत्सवातील विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे डिजिटल दस्तऐवजीकरण होण्यास मदत होणार आहे.
शासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न
‘लोकसंवाद २०२६’च्या माध्यमातून शासनाच्या योजना आणि उपक्रमांची माहिती केवळ कार्यालयीन पातळीवर न राहता ती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे. गणेश मंडळे, महिला बचत गट, सामाजिक संस्था तसेच नागरिकांच्या सहभागातून हा संवाद अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
महिला सक्षमीकरण, सुरक्षितता, स्वावलंबन आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment