गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली भाजप ग्रामीण पश्चिमची पहिली आढावा बैठक संपन्न
करमाळा (कटूसत्य वृत्त):- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्याची आढावा बैठक पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत टेंभुर्णी येथे पार पडली. भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमचे नूतन जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीस मंडल अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पक्ष संघटन मजबूत करणे, बूथ सक्षमीकरण, पदवीधर मतदार नोंदणी, शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रचार-प्रसार तसेच स्थानिक विकासकामांचा आढावा यावर चर्चा करण्यात आली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले. विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
माढा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ‘गाव तिथे शाखा, बूथ तिथे भाजपा’ या संकल्पनेनुसार प्रत्येक गाव व बूथवर संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले.
जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतरची पहिलीच अधिकृत आढावा बैठक असल्याने गणेश चिवटे यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राम सातपुते, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, चेतनसिंह केदार आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गणेश चिवटे यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडत सोलापूर ग्रामीण पश्चिममध्ये भाजपाचे संघटन अधिक सक्षम व गतिमान करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुरजाताई बोबडे यांच्यासह मंडल अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment