गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी – मंत्री प्रकाश आबिटकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 17, 2026

गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी – मंत्री प्रकाश आबिटकर

गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी – मंत्री प्रकाश आबिटकर




 मुंबई, (कटूसत्य वृत्त):-  गरीब व गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतील निधीपेक्षा अधिक खर्च येत असल्यास तो कॉर्पस फंडातून उपलब्ध करून द्यावा. त्याद्वारे राज्यातील अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण मोहिमेला गती द्यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक आणि सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयातील समिती कक्षात नुकतीच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

रुबी हॉल क्लिनिक या अंगीकृत रुग्णालयात कार्डियाक व कॅन्सर उपचारांची सुविधा शासनाच्या एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. खासगी रुग्णालये आणि शासकीय आरोग्य योजनांच्या समन्वयातून सर्वसामान्य रुग्णांना अधिक चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही मंत्री आबिटकर यांनी दिले.

पश्चिम महाराष्ट्रासह सीमावर्ती गोवा व कर्नाटक भागातील आणि ग्रामीण रुग्णांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर लवकर सुरू करण्याचे नियोजन आहे. या केंद्रात सीटी स्कॅन, एक्स-रे, ईसीजी, टू-डी इको आणि यूएसजीसारख्या निदान सुविधा माफक दरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे या भागातील रुग्णांना तपासण्यांसाठी पुणे किंवा मुंबई येथे जाण्याची गरज कमी होणार आहे.

कर्करोगावरील प्रोटॉन थेरपीची सुविधा सध्या महाराष्ट्रात केवळ मुंबईत उपलब्ध असल्याने अनेक रुग्ण या उपचारांपासून वंचित राहतात. त्यामुळे रुबी हॉल क्लिनिक आणि राज्याच्या आरोग्य विभागाच्या समन्वयातून पुण्यात कमी खर्चात प्रोटॉन थेरपीची अत्याधुनिक सुविधा सुरू करण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी रुबी हॉल रुग्णालयाचे विश्वस्त परवेझ ग्रँट, डॉ. सायमन ग्रँट, मुख्य कार्यकारी अधिकारी मुदित सक्सेना, जनरल मॅनेजर सचिन दंडवते, पूनम चव्हाण, आरोग्य विभागाचे सह सचिव मिलिंद कदम, वैद्यकीय सहायता कक्ष, पुणे येथील कौस्तुभ थोरात, प्रसाद बिराजदार आणि गणेश तिकोने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages