वकिली व्यवसायाला सामाजिक बांधिलकीची जोड आवश्यक
‘विधिमित्र सेवा’ पुरस्कारांचे वितरण; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव
सोलापूर, कटूसत्य वृत्त : वकिली व्यवसाय हा केवळ अर्थार्जनाचा व्यवसाय नसून सामाजिक भान आणि सेवाभावी वृत्ती जपण्याचे प्रभावी माध्यम आहे. समाजाप्रती असलेली ही बांधिलकी रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मास लॉ असोसिएट्स करीत आहे, असे गौरवोद्गार जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी काढले.
मास लॉ असोसिएट्सच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘विधिमित्र सेवा’ पुरस्कारांचे वितरण अॅड. प्रदीपसिंग राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. श्रीनिवास क्यातम होते. पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, डॉ. सूर्यप्रकाश कोठे, प्रा. डॉ. विजया महाजन आणि अॅड. शर्मिला देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विधी तसेच विविध विषयांवरील पुस्तकांच्या विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘विधिमित्र’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ‘संचार’चे उपसंपादक हरिश्चंद्र कदम व पत्रकार आफताब शेख यांना ‘विधिमित्र प्रसारमाध्यम सेवा पुरस्कार’, देवीदास घोडके यांना ‘विधिमित्र श्रमप्रतिष्ठा पुरस्कार’, संभव फाउंडेशनचे आतिश शिरसट यांना ‘विधिमित्र सामाजिक सेवा पुरस्कार’, अॅड. आझमोद्दीन शेख व अॅड. गीताराणी घनाते यांना ‘विधिमित्र विधी सेवा पुरस्कार’, तर श्रीनिवास चेरमन यांना ‘विधिमित्र शैक्षणिक सेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
यावेळी सोलापूर बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. नुकतीच न्यायाधीशपदाची परीक्षा उत्तीर्ण झालेले नागेश कोंडा तसेच सोलापूर विद्यापीठाच्या कायद्याच्या पदव्युत्तर परीक्षेत सुवर्णपदक मिळविलेले अॅड. अमर जिंदम यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मास लॉ असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष अॅड. मोहन कुरापाटी यांनी केले. स्वागत अॅड. श्याम आडम यांनी केले. सूत्रसंचालन अॅड. स्नेहा नारा यांनी केले, तर आभार अॅड. अनिल वासम यांनी मानले.
No comments:
Post a Comment