हद्दवाढ भागात नवीन सबस्टेशन उभारणार; धोकादायक वीजतारा हटविण्यासह विविध प्रश्नांवर बैठक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 1, 2026

हद्दवाढ भागात नवीन सबस्टेशन उभारणार; धोकादायक वीजतारा हटविण्यासह विविध प्रश्नांवर बैठक

 हद्दवाढ भागात नवीन सबस्टेशन उभारणार; धोकादायक वीजतारा हटविण्यासह विविध प्रश्नांवर बैठक




सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील वीजपुरवठा अधिक सुरक्षित, सक्षम व अखंडित करण्याच्या दृष्टीने हद्दवाढ भागात नवीन वीज उपकेंद्र (सबस्टेशन) उभारणे, धोकादायक वीजतारा हटविणे, भूमिगत केबल टाकणे, स्ट्रीट लाईटसाठी आवश्यक सर्व्हिस वायर उपलब्ध करून देणे तसेच शहरातील विविध प्रलंबित वीजविषयक प्रश्नांवर आज महापौर कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

महावितरण होल्डिंग कंपनीच्या स्वतंत्र संचालक नीताताई केळकर यांच्या उपस्थितीत व महापौर श्री. विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीच्या प्रारंभी महापौर श्री. कोंड्याल यांच्या हस्ते नीताताई केळकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

बैठकीस शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी ताई तडवळकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने, कार्यकारी अभियंता (शहर) विनायक इदायते, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला जंगम, नगरसेवक बिजू प्रधाने,नगरसेवक सत्यनारायण गुर्रम,नगरसेवक रवी कयावले, नगरसेवक भीमाशंकर केंगनाळकर, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष राजू राठी, सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, सहसचिव मल्लिकार्जुन कमटम, खजिनदार अंबादास भिंगी, संचालक नारायण आडकी, तसेच महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, महादेव इंगळे, मधुसूदन जंगम आदी उपस्थित होते.

बैठकीत हद्दवाढ भागात नवीन सबस्टेशन उभारण्यासाठी आवश्यक मोकळी जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. शहरातील अनेक भागांत वीजतारा घरांना लागून असल्याने किंवा धोकादायक स्थितीत असल्याने त्या तातडीने हटवून आवश्यक ठिकाणी भूमिगत केबल टाकण्याबाबत महापौरांनी सूचना केल्या. नवीन केबल टर्मिनेशन, सर्व्हिस वायरची उपलब्धता, स्ट्रीट लाईटसाठी आवश्यक विद्युत जोडण्या उपलब्ध करून देणे, धोकादायक विद्युत वाहिन्यांचे स्थलांतर तसेच शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गावरील धोकादायक केबल हटविण्याबाबतही बैठकीत निर्णय घेण्यात आला.

अमृत योजनेअंतर्गत देसाईनगर येथील एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) पूर्ण झाल्याने तो कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक ११ केव्ही विद्युत वाहिनी उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच महानगरपालिकेच्या स्मशानभूमींमधील वीज सुविधांचे बळकटीकरण, आवश्यक ठिकाणी विद्युत जोडण्या उपलब्ध करून देणे, शहरातील एलईडी पथदिवे, पंपिंग स्टेशनचा अखंडित वीजपुरवठा आणि इतर तांत्रिक विषयांचाही आढावा घेण्यात आला.

यावेळी महावितरण होल्डिंग कंपनीच्या स्वतंत्र संचालक नीताताई केळकर यांनी नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेत आपल्या घरांवर रूफटॉप सोलर प्रणाली बसवावी, सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर करावा तसेच वीज वापर पारदर्शक, अचूक आणि कार्यक्षम होण्यासाठी स्मार्ट मीटर बसविण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

महापौर विनायक कोंड्याल यांनी शहरातील वीजपुरवठ्याशी संबंधित सर्व प्रलंबित प्रश्नांना प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी महानगरपालिका व महावितरण यांच्यात आवश्यक समन्वय ठेवून तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages