योग्य वेळी निदानामुळे रुग्णांचे जीवनमान सुधारते : डॉ. रुपम बोरगोहेन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पार्किन्सन्स हा मेंदूशी संबंधित प्रगतिशील आजार असून योग्य वेळी निदान, औषधोपचार आणि डीप ब्रेन स्टिम्युलेशन (DBS) या आधुनिक उपचारपद्धतीच्या मदतीने रुग्णांचे जीवनमान सुधारता येते, अशी माहिती हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलच्या पार्किन्सन्स डिसीज अँड मूव्हमेंट डिसऑर्डर रिसर्च सेंटरचे कोर्स डायरेक्टर व वरिष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉ. रुपम बोरगोहेन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पार्किन्सन्समध्ये मेंदूमधील डोपामाइनचे प्रमाण कमी झाल्याने हात-पाय थरथरणे, हालचाली मंदावणे, स्नायू कडक होणे, चालण्यात अडचण, तसेच झोपेचे विकार, बद्धकोष्ठता आणि स्मरणशक्ती कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. सुरुवातीच्या टप्प्यात औषधांचा चांगला परिणाम होतो; मात्र कालांतराने औषधांचा प्रभाव कमी झाल्यास DBS हा प्रभावी पर्याय ठरतो.या शस्त्रक्रियेमध्ये मेंदूतील विशिष्ट भागात सूक्ष्म इलेक्ट्रोड बसवून नियंत्रित विद्युत संकेत दिले जातात. त्यामुळे थरथरणे, स्नायूंचा कडकपणा, हालचाली मंदावणे आणि इतर मोटर लक्षणांवर प्रभावी नियंत्रण मिळते, असे डॉ. रुपम बोरगोहेन यांनी सांगितले.
औषधांचा परिणाम कमी झालेल्या रुग्णांसाठी DBS हा दीर्घकालीन आणि प्रभावी उपचार असून रुग्णाच्या गरजेनुसार उपचारात आवश्यक बदल करता येतात. पार्किन्सन्सवरील शस्त्रक्रियात्मक उपचारांमध्ये DBS हा आजही 'गोल्ड स्टँडर्ड' मानला जातो. या आजाराबाबत जनजागृती वाढविणे आणि आधुनिक उपचारांची माहिती अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्याचे डॉ. रुक्मिणी मृदुला आणि डॉ. व्हीव्हीएसआरके प्रसाद यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस अतुल चव्हाण, नरेश सामल आदी उपस्थित होते.
.jpg)
No comments:
Post a Comment