जयकुमार गोरे यांच्यावर १९ गुन्हे, तरी मंत्रिपद कसे? भाजपची काय मजबुरी? : सुषमा अंधारे
सोलापूर (कटुसत्य वृत्तसेवा) : पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर १९ गुन्हे दाखल असल्याचा दावा करत, इतके गुन्हे असतानाही भाजपने त्यांना मंत्रिपद कसे दिले? भाजपच्या जुन्या निष्ठावंतांना डावलून गोरे यांना मंत्रिपद देण्याची पक्षाची काय मजबुरी होती? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.
उद्धवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी सुषमा अंधारे तीन दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. रविवारी सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. सुमारे ४५ मिनिटांच्या पत्रकार परिषदेत तब्बल ३५ मिनिटे त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर विविध आरोप करत सरकार आणि भाजपवर निशाणा साधला.
अंधारे म्हणाल्या, एखाद्या व्यक्तीवर चार-पाचपेक्षा अधिक गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याच्याविरोधात मोक्काची फाइल तयार केली जाते. भाजप अनेक व्यक्तींवर तत्काळ मोक्का लावण्याची भूमिका घेताना दिसते. मात्र, जयकुमार गोरे यांच्यावर १९ गुन्हे दाखल असल्याचा दावा असतानाही त्यांना मंत्रिपद देण्यात आले. मग भाजपच्या जुन्या निष्ठावंतांना डावलून गोरे यांना मंत्रिपद देण्याची नेमकी काय मजबुरी होती, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
'दुसरा एपिसोड उघडायला भाग पाडू नका'
जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत अंधारे यांनी गोरे यांना थेट इशारा दिला. गोरे यांच्याविरोधात काही आरोप आणि बाबी आपल्याकडे असल्याचा दावा करत, 'दुसरा एपिसोड उघडायला मला भाग पाडू नका; अन्यथा लगेच दुसरा एपिसोड उघडेन,' असा इशारा त्यांनी दिला.
पत्रकार परिषद सुरू असताना अचानक एक पोलिस कर्मचारी मोबाईलमध्ये चित्रीकरण करत असल्याचे अंधारे यांच्या निदर्शनास आले. त्यावर 'तुम्ही कशासाठी चित्रीकरण करत आहात? पत्रकार परिषद लाइव्ह आहे. नंतर फुटेज घ्या,' असा टोला त्यांनी पोलिसांना लगावला.
'एका पीएसआयवर कसली माया?'
मायणी येथील कोविड सेंटरमधील वैद्यकीय बिलांमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत अंधारे यांनी या प्रकरणाचाही उल्लेख केला. या प्रकरणाच्या आरोपपत्रातून जयकुमार गोरे यांचे नाव वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. गोरे यांचे नाव वगळणारे पोलिस अधिकारी घनश्याम सोनवणे यांनी नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमेला गोरे यांची भेट घेत सोशल मीडियावर 'आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे' अशी पोस्ट केल्याचे सांगत, 'एका पीएसआयवर कसली माया?' असा सवाल अंधारे यांनी केला.
५६ लाखांच्या पॅकेजचा सवाल
जयकुमार गोरे यांच्या २०१९ च्या आयकर विवरणपत्राचा संदर्भ देत अंधारे यांनी आणखी एक आरोप केला. सुहास पाटील या ठेकेदाराकडून कुटुंबातील एका व्यक्तीला ५६ लाख रुपयांचे पॅकेज मिळाल्याचा उल्लेख असल्याचा दावा त्यांनी केला. हे पॅकेज नेमके कोणत्या कामासाठी मिळाले होते, त्याचा तपशील उपलब्ध आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अंधारे यांनी सातारा जिल्ह्यातील एका महिलेने जयकुमार गोरे यांच्यावर अश्लील फोटो पाठविल्याचा आरोप केल्याच्या प्रकरणाचाही उल्लेख केला. या प्रकरणात संबंधित महिलेला पोलिसांनी एक कोटी रुपये घेताना पकडल्याचा दावा करत, त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेबाबत माध्यमांमध्ये अपेक्षित माहिती समोर आली नसल्याचे त्या म्हणाल्या. या एक कोटी रुपयांच्या रकमेचा स्रोत काय आणि ती अद्याप न्यायालयात का जमा झालेली नाही, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचा दावा अंधारे यांनी केला.
कल्याणशेट्टींचा पलटवार
दरम्यान, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सुषमा अंधारे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. 'कधी संजय राऊत, तर कधी सुषमा अंधारे. त्यांच्या स्वतःच्या पक्षात किती नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार उरले आहेत, हे त्यांनी स्वतः तपासून पाहावे,' अशी टीका त्यांनी केली.
पक्षातील अस्तित्व संपुष्टात आल्यामुळे केवळ चर्चेत राहण्यासाठी अशी वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप कल्याणशेट्टी यांनी केला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकांचे निकाल स्पष्ट असून, जनतेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचा दावा त्यांनी केला.
'आम्हाला मिळालेले यश विरोधकांच्या डोळ्यात खुपत आहे. विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी त्यांच्याकडे काही उरलेले नाही. त्यामुळे ते वैयक्तिक पातळीवर टीका करत आहेत. आम्ही अशा बालिश टीकेकडे लक्ष न देता विकासाच्या मुद्द्यांवर काम करत राहू,' असे कल्याणशेट्टी म्हणाले.
No comments:
Post a Comment