विद्यार्थ्यांवरील दडपशाही, राम मंदिर प्रकरणावर संसदेत विरोधकांचा हल्लाबोल
नवी दिल्ली (वृत्त सेवा):- जंतरमंतर येथे विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसी कारवाईचा निषेध आणि अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी सोमवारी संसद भवन परिसरात जोरदार आंदोलन केले. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह विविध विरोधी पक्षांचे खासदार या आंदोलनात सहभागी झाले.
संसदेच्या मकरद्वारासमोर झालेल्या आंदोलनादरम्यान खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत उपस्थित राहून जंतरमंतर येथील घटनेबाबत देशाला उत्तर द्यावे, अशी मागणी केली. यावेळी "अमित शाह संसदेत या", "अमित शाह संसदेतून का गायब आहेत?", "चंदा चोर, गद्दी छोडो" अशा घोषणा देत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
प्रणिती शिंदे यांचा सरकारवर निशाणा
आंदोलनानंतर माध्यमांशी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी जंतरमंतर येथे विद्यार्थी आंदोलनकर्त्यांवर लाठीमार, अश्रुधुराचा मारा आणि पॅलेट गनचा वापर झाल्याचे गंभीर आरोप केले. आंदोलनात सहभागी झालेल्या महिला व विद्यार्थिनींशी गैरवर्तन झाल्याच्या तसेच त्यांच्या कपड्यांची विटंबना झाल्याच्या आरोपांचाही त्यांनी उल्लेख केला.
"विद्यार्थ्यांवर अशा प्रकारची कारवाई करण्याचे आदेश कोणी दिले, याचे उत्तर देशाला मिळाले पाहिजे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत येऊन या संपूर्ण प्रकरणावर भूमिका स्पष्ट करावी. संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून ते सभागृहात अनुपस्थित राहिल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत," असे त्या म्हणाल्या.
त्यांनी पुढे सांगितले की, लोकशाहीमध्ये सरकारने जनतेच्या प्रश्नांना उत्तर देणे अपेक्षित असते. उत्तरदायित्व टाळण्याची प्रवृत्ती ही लोकशाहीसाठी घातक असून सरकार कितीही टाळाटाळ करत असले तरी जनतेसमोर उत्तर द्यावेच लागेल.
देणगीपेट्यांसह प्रतीकात्मक आंदोलन
राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराचा निषेध नोंदविण्यासाठी आंदोलनकर्त्या खासदारांनी संसद परिसरात प्रतीकात्मक स्वरूपात देणगीपेट्या ठेवल्या. काही खासदारांनी त्या पेट्यांमध्ये पैसे टाकून कथित गैरव्यवहाराकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली.
यापूर्वी शुक्रवारीही इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद परिसरात प्रतीकात्मक नाट्य सादर केले होते. त्या वेळी राहुल गांधींसह काही खासदारांनी देणगीपेटीत पैसे टाकले, तर खासदार पप्पू यादव यांनी प्रतीकात्मक स्वरूपात ते पैसे खिशात टाकून कथित देणगी गैरव्यवहाराचा निषेध व्यक्त केला होता.
विविध पक्षांचे खासदार सहभागी
या आंदोलनात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव, धर्मेंद्र यादव, तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा, झारखंड मुक्ती मोर्चाच्या महुआ माजी, आरएसपीचे एन. के. प्रेमचंद्रन यांच्यासह इंडिया आघाडीतील विविध पक्षांचे खासदार सहभागी झाले.
आंदोलनावेळी खासदार "अमित शाह संसदेत का अनुपस्थित आहेत?" असा मजकूर असलेल्या मोठ्या फलकामागे उभे राहून सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते.
सरकारला घेरण्याची रणनीती
दरम्यान, संसदेतील राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात सोमवारी सकाळी इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या संसदीय नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत चालू अधिवेशनात सरकारला विविध मुद्द्यांवर घेरण्याची रणनीती निश्चित करण्यात आली. विद्यार्थी आंदोलनावरील कथित पोलिसी कारवाई, राम मंदिरातील कथित देणगी प्रकरण तसेच इतर राष्ट्रीय प्रश्नांवर सरकारला उत्तरदायी धरण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, या आंदोलनावरून राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला असून भाजप आणि काही हिंदू संघटनांनी या आंदोलनातील प्रतीकात्मक सादरीकरणावर आक्षेप घेत, त्यातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.
.png)
.png)
No comments:
Post a Comment