खा. संजय राऊतांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक तर पालकमंत्री गोरेंवर निशाणा
सोलापूरात ठाकरे गट आक्रमक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यातील राजकीय कलगीतुरा आता चांगलाच पेटला आहे. भाजपने सोमवारी संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केल्यानंतर, सोलापुरात ठाकरे सेनेने आक्रमक पवित्रा घेतला.
संजय राऊत यांच्या समर्थनार्थ आंदोलन करताना ठाकरे गटाचे सोलापूर जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांची पालकमंत्री गोरे यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. दरम्यान, पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर राजकीय टीका केली होती. गेल्या दोन दिवसांपासून त्याचे पडसाद उमटत आहेत. रविवारी (दि.२) भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करीत आंदोलन केलेल्या चार हुतात्मा पुतळा चौक येथे सोमवारी (दि. ३) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्यांनी खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घातला. तसेच, भाजपने आंदोलन केलेली जागा गोमूत्र शिंपडून स्वच्छ केली. या घडामोडींमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता, ज्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आंदोलकांना ताब्यात घेतले.
याप्रसंगी बोलताना शहर प्रमुख महेश धाराशिवकर म्हणाले, खासदार संजय राऊत हे शिवसैनिकांचे प्रेरणास्थान आहेत. खासदार राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याबाबत पालकमंत्री गोरे रविवारी सायंकाळी सोलापूरात येणार असल्याचे समजल्यानंतर भाजपच्या काहींनी त्यांच्या समर्थनार्थ आंदोलनाचे नाटक केले. प्रत्यक्षात, आंदोलनाचा दिखावा करून गोरेंकडून कंत्राट अथवा काहीतरी चिरीमिरी मिळावी, म्हणून तो खटाटोप केला आहे. भाजपचे ते आंदोलनकर्ते पालकमंत्र्याकचे लाभार्थी होते, अशी टिका शहरप्रमुख धाराशिवकर यांनी केली. निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना खासदार राऊत यांनी पालकमंत्री गोरेंचा समाचार घेतल्याबाबत निश्चित आनंद वाटला असेल, असेही धाराशिवकर यांनी सांगितले.
यावेळी शरणराज केंगनाळकर, संजय पेळ, सुरेश जगताप, दत्ता माने, राजाभाऊ कुसेकर, चंद्रकांत मानवी, योगेश सलगर, उज्वल दीक्षित आदी उपस्थित होते.
आरक्षित जागा विकण्याचे धंदे बंद करा: प्रताप चव्हाण
या आंदोलनादरम्यान बोलताना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण आक्रमक झाले आणि त्यांची भाषा घसरली. पालकमंत्र्यांवर थेट गंभीर आरोप करताना चव्हाण म्हणाले, “या पालकमंत्र्याना काहीच कळत नाही. सोलापूर शहरातील उमेदवार फोडणे आणि पैशांच्या बळावर दमदाटी करणे हेच त्यांचे उद्योग सुरू आहेत. आरक्षित जागा विकणे आणि हजारो कोटी कमावणे हे धंदे त्यांनी बंद करावेत, अन्यथा सोलापूर शहर बंद करून तीव्र आंदोलन छेडले जाईल. तसेच, “शिवसेनेच्या नादाला लागल्यास याद राखा, शिवसेना अशा दडपशाहीला घाबरत नाही,” असा इशारा त्यांनी दिला. राऊत यांनी वापरलेल्या वादग्रस्त भाषेचे समर्थन करताना, ती केवळ संभाषणातील बोलीभाषा होती, अशी सारवासारव स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली.

No comments:
Post a Comment