वैरागमध्ये राजकीय भूकंप; उपनगराध्यक्ष भूमकरांसह १५ नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 19, 2026

वैरागमध्ये राजकीय भूकंप; उपनगराध्यक्ष भूमकरांसह १५ नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

वैरागमध्ये राजकीय भूकंप; उपनगराध्यक्ष भूमकरांसह १५ नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश




वैराग (कटूसत्य वृत्त) : वैराग नगरपंचायतीचे विद्यमान उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निरंजन भूमकर यांच्यासह नगरपंचायतीतील १५ नगरसेवकांनी मंगळवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे वैरागच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, नगरपंचायत आणि परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


मुंबईतील नंदनवन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार शहाजीबापू पाटील तसेच बार्शीचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.


निरंजन भूमकर यांच्यासोबत नगरपंचायतीतील १५ नगरसेवक, आजी-माजी नगरसेवक, काही ग्रामपंचायत सदस्य, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच वैराग शहर आणि ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते व समर्थकांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.


वैराग शहराला विविध विकासकामांसाठी आवश्यक निधी मिळावा, अपर तहसील कार्यालय सुरू व्हावे, श्री संतनाथ महाराज सहकारी साखर कारखाना, एमआयडीसी तसेच शहरातील विविध प्रलंबित विकासकामांना गती मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी आपण शिंदे गटात प्रवेश केल्याचे निरंजन भूमकर यांनी सांगितले.


वैरागचा सर्वांगीण विकास आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतल्याचेही भूमकर यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, एकाचवेळी उपनगराध्यक्षांसह १५ नगरसेवक आणि मोठ्या संख्येने स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षांतर केल्याने वैरागच्या राजकारणात शिंदे गटाची ताकद वाढली आहे. आगामी काळात या पक्षप्रवेशाचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages