वैराग (कटूसत्य वृत्त) : मराठा समाजातील माता-भगिनींबाबत आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करत वैराग परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने नवनाथ वाघमारे यांचा जाहीर निषेध करण्यात आला. संबंधित वक्तव्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या असून, वाघमारे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारे निवेदन वैराग पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव यांना देण्यात आले.
वाघमारे यांच्या कथित वक्तव्यामुळे समाजाच्या भावना तीव्र स्वरूपात दुखावल्या असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाच्या निषेधार्थ काही उपस्थितांनी नवनाथ वाघमारे यांना मारहाण करणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे वक्तव्य केल्याचेही सांगण्यात आले. अशा वक्तव्यांमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी डॉ. कपिल कोरके यांनी, या प्रकरणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली.
यावेळी डॉ. कपिल कोरके, वैजिनाथ आदमाने, समाधान पवार, मनोज वाघमारे, आण्णा गाटे, महेश पन्हाळे, हरिश्चंद्र पोळ, बालाजी ढेकळे, शहाजी आगलावे, सतीश करंडे यांच्यासह सकल मराठा समाजातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या प्रकरणामुळे वैराग परिसरातील सामाजिक वातावरण संवेदनशील झाले असून, संबंधित वक्तव्याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment