वाशिंबे स्थानकावर दौंड–कलबुर्गी शटलचे उत्साहात स्वागत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 29, 2026

वाशिंबे स्थानकावर दौंड–कलबुर्गी शटलचे उत्साहात स्वागत

 वाशिंबे स्थानकावर दौंड–कलबुर्गी शटलचे उत्साहात स्वागत



करमाळा (कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील वाशिंबे रेल्वे स्थानकावर दौंड–कलबुर्गी शटल गाडीला प्रवासी थांबा सुरू झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवार (दि. २८ ऑगस्ट) रोजी शटल गाडी वाशिंबे स्थानकावर दाखल होताच ग्रामस्थांनी उत्साहात गाडीचे स्वागत केले. यावेळी लोको पायलट यांचा शाल, श्रीफळ व पेढे देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांनी प्रवाशांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. तसेच वाशिंबे स्थानकावर शटलला प्रवासी थांबा मंजूर केल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे आभार मानण्यात आले.
थांबा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी वाशिंबे येथून अक्कलकोट, गंगापूर आणि सोलापूरकडे जाणाऱ्या तब्बल ६८ प्रवाशांनी या शटलने प्रवास केला. त्यामुळे नव्याने सुरू झालेल्या थांब्याला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
या थांब्यामुळे वाशिंबे व परिसरातील विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार तसेच सर्वसामान्य नागरिकांची मोठी सोय झाली आहे. अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
दौंड–कलबुर्गी शटल गाडी वाशिंबे येथून सकाळी ७.१० वाजता कुर्डुवाडी स्थानकावर पोहोचते. त्यामुळे वाशिंबे परिसरातील प्रवाशांना कुर्डुवाडी येथे उतरून पुढील प्रवासासाठी विविध एक्स्प्रेस गाड्यांची जोडणी घेणे शक्य होणार आहे. कुर्डुवाडी येथून पंढरपूर, कोल्हापूर, आदमापूर, मिरज, लातूर, बार्शी, हरंगुळ, दौंड, अहिल्यानगर आणि पुणे आदी ठिकाणी जाण्यासाठी उपलब्ध असलेल्या रेल्वे सेवांचा वाशिंबे व परिसरातील प्रवाशांना लाभ घेता येणार आहे. त्यामुळे या थांब्यामुळे परिसरातील नागरिकांना विविध शहरांशी रेल्वेमार्गे जोडले जाण्याची सुविधा अधिक सुलभ झाली आहे.
वाशिंबे येथे प्रवासी थांबा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी ६८ प्रवाशांनी प्रवास केल्याने या सुविधेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या थांब्यामुळे सोलापूर, अक्कलकोट, गंगापूरसह अन्य शहरांमध्ये जाणे सुलभ झाले असून, कुर्डुवाडी येथे मिळणाऱ्या पुढील रेल्वे गाड्यांच्या जोडणीमुळे वाशिंबे स्थानकाचा प्रवाशांना अधिक मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे आगामी काळात स्थानकावरील प्रवासी संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages