आमदार राजेंद्र राऊत यांचा सपत्नीक सत्कार; ‘मराठा भूषण’ पदवीने गौरव
समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार : राजेंद्र राऊत
बार्शी (कटूसत्य वृत्तसेवा) : विधान परिषद सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विजयी झाल्याबद्दल आमदार राजेंद्र राऊत आणि त्यांच्या पत्नी कविता राऊत यांचा सकल मराठा समाज, बार्शी यांच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि ह.भ.प. डॉ. जयवंत बोधले महाराज यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला.
यावेळी नरेंद्र पाटील यांनी आमदार राजेंद्र राऊत हे मराठा समाजाचे खरे भूषण असल्याचे सांगितले. विधान परिषद निवडणुकीत भरघोस मतांनी मिळालेला विजय हा त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची पावती असल्याचे त्यांनी नमूद केले.
ह.भ.प. डॉ. जयवंत बोधले महाराज यांनी संत आणि समाजाच्या आशीर्वादामुळे राजेंद्र राऊत यांना मोठा विजय मिळाल्याचे सांगितले. समाजासाठी काम करताना राजकारणाकडे समाजसेवेच्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सत्काराला उत्तर देताना आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, “मराठा समाजाने मला ‘मराठा भूषण’ ही पदवी देऊन मोठे केले आहे. समाजाने माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि प्रेम मी कधीही विसरणार नाही. समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सदैव प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहीन.” राजकारण हे समाजसेवेचे माध्यम असून, मिळालेली जबाबदारी जनतेच्या हितासाठी पार पाडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या सत्कार सोहळ्यास डॉ. बी. वाय. यादव, दास शेळके, सुनील रसाळे, सुनील मोरे, दिलीप कोल्हे, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, संतोष निंबाळकर, विजय गरड, रोहित पाटील, अरुण बारबोले, मंगल शेळवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment