पोलीस व निर्भय पथकास सहकार्य करण्याची भूमिका नागरिकांनी घ्यावी- अमोल पन्हाळकर
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी निर्भय पथक महत्त्वाची भूमिका बजावत असून शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, बसस्थानके तसेच गर्दीच्या ठिकाणी हे पथक गस्त घालून छेडछाड, विनयभंग, पाठलाग किंवा महिलांना त्रास देणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवून कारवाई करत आहे. अशावेळी नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांनी केले
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित पंचप्पा कल्याणशेट्टी शिक्षण संकुलातील सर्व शाखांच्या वतीने आयोजित केलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी सुरक्षा कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, पोलीस उपनिरीक्षक अजय सुतार, पोलीस अंमलदार महादेव सुतार, निर्भय पथकातील नीता बिराजदार, रेणुका कोळी व मनीषा चिंचोळकर उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक अजय सुतार म्हणाले की, निर्भय पथकाच्या माध्यमातून महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिलांनी अन्याय किंवा छळ सहन न करता त्याविरोधात आवाज उठवणे आणि गरज पडल्यास पोलिसांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
नीता बिराजदार म्हणाल्या की, फेसबुक इंस्टाग्राम वापरताना कोणती काळजी घ्यावी हे सांगितले. पोलीस सुरक्षा आणि निर्भय पथकाच्या सतर्क कार्यामुळे समाजात सुरक्षित व निर्भय वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आहे. मात्र केवळ पोलिसांवर अवलंबून न राहता प्रत्येकानी कायद्याचा आदर करून सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे.
मनीषा चिंचोळकर म्हणाल्या की, अल्पवयात, लायसन नसताना बेकायदेशीर गाडी चालवू नका, स्वतःचे जीव धोक्यात घालवू नका. तसेच मुलींनी पोलिसांना सहकार्य करून संशयास्पद किंवा अनुचित प्रकारांची माहिती त्वरित दिली पाहिजे. त्यामुळे गुन्हेगार पकडणे पोलिसांना शक्य होईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्रामप्पा पाटील यांनी केले, सूत्रसंचलन कल्पना स्वामी यांनी केले आभार मनीषा सुरवसे यांनी मानले.
*चौकट
माहिती आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर करू नका
माहिती आणि तंत्रज्ञानाचे साधन असलेल्या भ्रमणध्वनी व्हाट्सअप, ट्विटर, फेसबुक आदीचा गैरवापर विद्यार्थ्यांनी करू नये त्यामुळे सायबर क्राईमचे गुन्हे होऊ शकतात असे प्रतिपादन रेणुका कोळी यांनी केले.

No comments:
Post a Comment