गाईच्या दूध खरेदी दरात एक रुपयाची वाढ; दर आता ४० रुपये - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 10, 2026

गाईच्या दूध खरेदी दरात एक रुपयाची वाढ; दर आता ४० रुपये

 गाईच्या दूध खरेदी दरात एक रुपयाची वाढ; दर आता ४० रुपये

राज्यातील प्रमुख दूध संस्थांचा निर्णय; दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, मात्र पशुखाद्याच्या वाढत्या दराचे आव्हान

सोलापूर (कटुसत्य वृत्तसेवा) : राज्यातील प्रमुख दूध संस्थांनी गाईच्या दूध खरेदी दरात सोमवारपासून (११ ऑगस्ट) प्रति लिटर एक रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गाईच्या दूधाचा खरेदी दर आता प्रति लिटर ४० रुपये झाला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही वाढ काही प्रमाणात दिलासादायक ठरणार असली, तरी पशुखाद्याच्या वाढलेल्या दरामुळे उत्पादन खर्चाचा प्रश्न कायम आहे.

गुजरातमधील अमूल डेअरीच्या गाईच्या दूध खरेदी दराचा जुलै महिन्यातील दर ४१ रुपये प्रति लिटर होता. ऑगस्टमध्ये हा दर ४० रुपयांवर आल्याचे सांगितले जात असले, तरी अमूलकडून याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नसल्याचेही सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रमुख दूध संस्थांनी आपल्या खरेदी दरात एक रुपयाने वाढ केली आहे.

मागणी वाढल्याने दरवाढ

सोनाई दूध संस्थेचे अध्यक्ष दशरथ माने यांनी सांगितले की, परदेशातून आयात होणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांचे प्रमाण कमी झाले आहे. राज्यातील दूध संकलनात मोठी घट झालेली नसली, तरी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढली आहे. त्यामुळे दूध खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे. आगामी काळात दूध खरेदी दरात घट होण्याची शक्यता वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, दूध खरेदी दरात मोठी वाढ होणार असल्याची चर्चा काही काळापासून सुरू होती. मात्र, अपेक्षेइतकी मोठी वाढ न होता आता टप्प्याटप्प्याने दरवाढ सुरू झाली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची धुरा तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर सुमारे अडीच महिन्यांनी दूध खरेदी दरात वाढ होण्यास सुरुवात झाल्याचेही या पार्श्वभूमीवर सांगितले जात आहे.

पशुखाद्याच्या दरवाढीचे आव्हान कायम

दूध खरेदी दरात एक रुपयाची वाढ झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना वरकरणी दिलासा मिळाला आहे. मात्र, गेल्या काही काळात पशुखाद्य, चारा आणि इतर उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ४० रुपये प्रति लिटर दर मिळाल्यानंतरही प्रत्यक्ष उत्पादन खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात किती रक्कम उरणार, हा प्रश्न कायम आहे.

दूध दरवाढीचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळत असला, तरी उत्पादन खर्चाच्या तुलनेत ही वाढ पुरेशी आहे का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages