‘दिलीप सोपल यांच्यापेक्षा पक्षाचा जिल्हाप्रमुख मोठा’
सुषमा अंधारे यांचा टोला; सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करताना घाई न करण्याचा सल्ला
सोलापूर (कटुसत्य वृत्तसेवा) : बार्शी विधानसभा मतदारसंघाच्या संघटनात्मक बैठकींना पक्षाचे आमदार दिलीप सोपल उपस्थित नसल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टोला लगावला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाच्या संघटनात्मक रचनेत आमदारांपेक्षा जिल्हाप्रमुखाला अधिक महत्त्व दिले असल्याचे सांगितले होते. त्यामुळे पक्षाच्या दृष्टीने आमदारांपेक्षा जिल्हाप्रमुख मोठा असल्याचे अंधारे म्हणाल्या.
उद्धवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या अंधारे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. बार्शी विधानसभा मतदारसंघासाठी आपण चार बैठका घेतल्या; मात्र या चारही बैठकांना पक्षाकडून निवडून आलेले आमदार दिलीप सोपल उपस्थित नव्हते, असे त्यांनी सांगितले. कदाचित त्यांना काही महत्त्वाची कामे असतील, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
बार्शीच्या बैठकीला जिल्हाप्रमुख उपस्थित होते. शिवसैनिकांसाठी पक्ष मोठा आहे. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनीही सर्वोच्च न्यायालयात विधिमंडळातील पक्षापेक्षा संघटनात्मक पक्ष मोठा असल्याचा युक्तिवाद केला होता. त्यामुळे आमदारांपेक्षा जिल्हाप्रमुखाचे काम महत्त्वाचे असल्याचे अंधारे म्हणाल्या.
बार्शी, मोहोळ तसेच अन्य ठिकाणच्या जिल्हाप्रमुखांनी चुकीचे काम केले तर त्यांना आपण उत्तर देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपमधील अंतर्गत कलहावर भाष्य
भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत कलह सुरू असल्याचा दावा करत अंधारे यांनी पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राजकीय स्थितीवरही भाष्य केले. पंकजा मुंडे यांना आता राजकारणातून निवृत्त व्हावेसे वाटत असल्याचे वक्तव्य त्यांनी केल्याचा दावा अंधारे यांनी केला. चंद्रकांत पाटील अडचणीत कसे येतील, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस केंद्रात कधी जातात आणि मुख्यमंत्रीपदाची संधी आपल्याला कधी मिळते, याची चंद्रशेखर बावनकुळे वाट पाहत असल्याचेही अंधारे म्हणाल्या.
सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करण्यास घाई नको
सुनेत्रा पवार यांच्यावर सुरुवातीपासूनच टीका करण्याची घाई करू नये, त्यांना काम करण्याची संधी दिली पाहिजे, असे मत अंधारे यांनी व्यक्त केले. इंदिरा गांधी यांच्यावरही सुरुवातीच्या काळात 'गुंगी गुडिया' म्हणून टीका करण्यात आली होती; मात्र त्यांनी आपल्या कर्तृत्वातून टीकाकारांना उत्तर दिले, असे उदाहरण त्यांनी दिले.
बीडच्या प्रश्नावर निर्णय घेताना कठोर भूमिका घेण्याची गरज असून, या संदर्भात तटकरे यांना बाजूला ठेवून कठोर पावले उचलली पाहिजेत, असा सल्लाही अंधारे यांनी दिला.
ज्योती वाघमारे यांच्या टीकेवर अंधारेंची नाराजी
शिंदेसेनेच्या खासदार प्रा. ज्योती वाघमारे या सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असल्याबाबत अंधारे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी या विषयावर अधिक भाष्य करण्यास नकार देत, 'अरे जाऊ द्या ना राव. काहीतरी दर्जा राखा. या विषयावर मला काही बोलायची इच्छा नाही,' अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली.
No comments:
Post a Comment