किरण घाडगे-माने यांना शिक्षणशास्त्र विषयात पीएच.डी.
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अकलूज येथील रहिवासी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वेळापूर (मुली) येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती किरण घाडगे-माने यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून शिक्षणशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या यशामुळे अकलूजच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
बार्शी येथील कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये डॉ. आर. ए. फुरडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी “A Study of the Current Status of Information and Communication Technology (ICT) Usage at the Primary Education Level in Solapur District” या विषयावर संशोधन पूर्ण केले. सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण स्तरावरील माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाच्या वापराची सद्यस्थिती, तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये माहिती-तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर करताना येणाऱ्या अडचणी यांचा त्यांच्या संशोधनात अभ्यास करण्यात आला आहे. हे संशोधन शिक्षक तसेच शासनासाठी दिशादर्शक ठरणारे आहे.
श्रीमती घाडगे-माने यांचे प्राथमिक शिक्षण शिवणे येथील जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण शिवणे हायस्कूलमध्ये झाले. सांगोला विद्यामंदिर येथे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण, संभाजीराव शिंदे अध्यापक विद्यालय, सोलापूर येथे डी.एड., शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून पदवी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून बी.एड. आणि एसएनडीटी विद्यापीठ, मुंबई येथून एम.एड. पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. तसेच गव्हर्नमेंट डिप्लोमा इन को-ऑपरेशन अँड अकाउंटन्सी आणि शालेय व्यवस्थापन पदविकाही त्यांनी पूर्ण केली आहे. शिक्षणशास्त्र विषयातून त्यांनी सेट व नेट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत.
गेल्या २० वर्षांपासून त्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ज्ञानदानाच्या कार्यासोबतच त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली आहे. उघडेवाडी शाळेत कार्यरत असताना स्वतः सायकली भेट देऊन त्यांनी ‘सायकल बँक’ योजना सुरू केली. त्यांच्या पुढाकारामुळे शाळेला मोठ्या प्रमाणात सायकली प्राप्त झाल्या. गेल्या दहा वर्षांपासून त्या दरवर्षी आपल्या मुलांचे वाढदिवस जिल्हा परिषद शाळांमध्ये साजरे करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करतात. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचे कामही त्या सातत्याने करीत आहेत.
ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या श्रीमती किरण घाडगे-माने यांचा हा शैक्षणिक प्रवास विद्यार्थी आणि तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील, पती, मुले, घाडगे व माने परिवारातील सदस्य, नातेवाईक, सहकारी शिक्षक, गुरुवर्य, मैत्रिणी आणि विद्यार्थ्यांना दिले आहे. प्रामाणिक कष्ट, थोरामोठ्यांचे आशीर्वाद व प्रेरणा आणि विद्यार्थ्यांच्या शुभेच्छांमुळे हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांच्या या यशाबद्दल माळशिरस तालुक्याचे माजी गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी, विस्तार अधिकारी हुसेनसो बारस्कर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळापूरचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, शिक्षकवृंद, सहकारी, मैत्रिणी, आप्तेष्ट व स्नेहीजनांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
.png)
No comments:
Post a Comment