शिवरत्न' विरुद्ध 'भारतरत्न'; जिल्हा परिषदेत नामकरणावरून राजकीय वाद पेटला
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- जिल्हा परिषद सभागृहाला माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यावरून जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने या निर्णयाचे जोरदार स्वागत करत हा पक्षासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. तर विरोधकांनी हा निर्णय एकतर्फी असल्याचा आरोप करत, जिल्हा परिषद ही सर्वसामान्यांची संस्था असून अशा विषयांवर सर्वपक्षीय सहमती आवश्यक असल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे 'शिवरत्न विरुद्ध भारतरत्न' असा राजकीय संघर्ष रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "देशाच्या जडणघडणीत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने अनेक ऐतिहासिक निर्णय अनुभवले. अशा महान व्यक्तिमत्त्वाचे नाव जिल्हा परिषद सभागृहाला देणे हा तमाम भाजप कार्यकर्त्यांसाठी अभिमानाचा क्षण आहे."
मात्र या निर्णयावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. "जिल्हा परिषद ही केवळ भाजप कार्यकर्त्यांची नाही, तर सर्वसामान्य नागरिकांची लोकशाही संस्था आहे. त्यामुळे कोणत्याही महत्त्वाच्या नामकरणाच्या निर्णयात सर्वपक्षीय चर्चा आणि सर्वसमावेशक भूमिका असणे गरजेचे आहे," अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रशांत बाबर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचाच दाखला देत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. "स्वतः अटलबिहारी वाजपेयी म्हणायचे, 'छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता.' याचा मराठी अर्थ म्हणजे 'मन मोठं असेल तरच माणूस मोठा होतो; खचलेल्या मनाने कोणीही उभं राहू शकत नाही.' त्यामुळे त्यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून सर्वांना विश्वासात घेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल," असे बाबर म्हणाले.
जिल्हा परिषद सभागृहाच्या नामकरणाचा विषय आता केवळ एका नावापुरता मर्यादित राहिलेला नसून, तो राजकीय प्रतिष्ठेचा मुद्दा बनल्याचे चित्र आहे. एका बाजूला भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाला पाठिंबा, तर दुसऱ्या बाजूला 'शिवरत्न'च्या नावाची मागणी आणि सर्वपक्षीय सल्लामसलतीचा आग्रह यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चौकट-१
"शिवरत्न" आणि "भारतरत्न" यांची थेट तुलना होऊ शकत नाही.
भारतरत्न हा भारत सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे, जो देशासाठी असामान्य योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.
शिवरत्न हा शब्द प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याशी किंवा त्यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या सन्मान/उपाधीसाठी वापरला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श व प्रेरणा जगभरात घेतली जाते. हा भारतरत्नसारखा राष्ट्रीय नागरी पुरस्कार नाही.
म्हणून पुरस्कार किंवा अधिकृत सन्मानाच्या दृष्टीने "भारतरत्न" हा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान आहे. तर "शिवरत्न" हा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भावनिक संदर्भातील गौरवाचा शब्द आहे.
दोन्हींचे महत्त्व वेगवेगळ्या संदर्भात आहे. त्यामुळे "कोणते नाव मोठे?" यापेक्षा "दोन्ही नावे त्यांच्या-त्यांच्या स्थानावर मानाची आहेत" असे म्हणणे अधिक अचूक आणि संतुलित ठरेल. त्यामुळे कोणीही त्या नावांचा अवमान करू नये. आणि हे नाव काढून ते घेण्याचा प्रयत्नही करू नये. अशी प्रतिक्रिया जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
चौकट-२
'कोणाचाही पुतळा हटवू नका, शिवरायांचा पुतळा उभारा' - जिप उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सोलापूर जिल्हा परिषदेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जावा, अशी इच्छा व्यक्त करताना जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी कोणाचाही विद्यमान पुतळा हटविण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहाचे नामकरण भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने करण्याचा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत मांडल्यानंतर त्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाचे भाजपकडून स्वागत करण्यात आले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि संभाजी ब्रिगेडने त्यास विरोध दर्शविला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आवारातील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचा पुतळा हटविण्यात येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना इंद्रजीत पवार म्हणाले, कोणाचाही पुतळा हटविण्याचा प्रश्नच नाही. मात्र, जिल्हा परिषदेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असावा, ही माझी वैयक्तिक आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून मनापासून इच्छा आहे.
शिवरत्न सभागृहाला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याच्या ठरावाबाबत बोलताना त्यांनी, जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असून स्थायी समितीत हा ठराव एकमताने मंजूर झाला आहे. अशा महान नेत्याचे नाव सभागृहाला देण्यात चुकीचे काय आहे? असा सवालही उपस्थित केला.
.png)
No comments:
Post a Comment