रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम पुढेही सुरू राहणार – मंत्री प्रताप सरनाईक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 26, 2026

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम पुढेही सुरू राहणार – मंत्री प्रताप सरनाईक

 

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम पुढेही सुरू राहणार – मंत्री प्रताप सरनाईक




मुंबई(कटूसत्य वृत्त):-  महाराष्ट्रात रिक्षा व टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या उद्देशाने परिवहन विभागाच्या सामाजिक बांधिलकीतून राबविलेल्या १०५ दिवसांच्या विशेष उपक्रमाद्वारे राज्यातील सुमारे १ लाख ६५ हजार ८०० रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हा उपक्रम पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

परिवहन मंत्री सरनाईक यांनी मंत्रालयात पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कामगार नेते शशांक राव तसेच कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले की, रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण या उपक्रमाला रिक्षा-टॅक्सी चालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राची अस्मिता आणि संस्कृतीचा आदर राखण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

ज्या रिक्षा-टॅक्सी चालकांना अद्याप मराठी भाषेचे प्रशिक्षण घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून कार्यशाळा सुरू ठेवण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, भिवंडी, नालासोपारा, वसई-विरार आणि नवी मुंबई या भागांतील प्रशिक्षण केंद्रांची यादी संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. प्रशिक्षण केंद्रांची माहिती मिळण्यासाठी आरटीओच्या माध्यमातून स्वतंत्र संपर्क क्रमांक लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

परिवहन विभागाने हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि समाजसेवेच्या भावनेतून राबविला आहे. मात्र, परिवहन विभागाच्या निर्देशांचे उल्लंघन करून कायद्याच्या कक्षेबाहेर जाऊन कोणी काम करत असल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करणे ही विभागाची जबाबदारी आहे, असे मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले. मराठी भाषा विभागांतर्गत राबविण्यात येणारे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान’ सातत्याने पुढे सुरू ठेवण्याचे धोरण असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. मराठी भाषा शिकण्यास इच्छुक असलेल्या रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी कार्यशाळा घेण्यास कामागार नेते शशांक राव यांनीही सहमती दर्शविली आहे.

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी अतिरिक्त मुदत देण्याबाबत मंत्री श्री. सरनाईक म्हणाले की, संबंधित चालकांना एक महिन्याची प्रारंभिक मुदत देण्यात येईल. या कालावधीत चालकांना मराठी शिकण्याची संधी दिली जाईल. त्यानंतरही मराठी भाषा शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्यास कायद्यानुसार बॅज रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

मुंबई आणि ठाणे परिसरातील वातावरण बिघडविण्याचा काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचे सांगून मंत्री सरनाईक यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. रिक्षा-टॅक्सी संघटनांचे पदाधिकारी आणि नेत्यांशी शासन सातत्याने संवाद साधत असून, त्यांच्या सूचनांचा विचार करून कोणावरही चुकीच्या पद्धतीने कारवाई होणार नाही, अशी शासनाची भूमिका असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages