NEET पेपरफुटीतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी
सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा पाठिंबा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- NEET पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थी व युवकांना न्याय मिळावा, तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषणास बसलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांना देण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी NEET पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाल्याचा आरोप करत दोषींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी उपोषण करणारे सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाकडे केंद्र सरकारने केलेले दुर्लक्ष हे लोकशाहीविरोधी असल्याची टीका करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात शहराध्यक्ष महेश गादेकर, प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव, जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, महिला अध्यक्षा सुनीता रोटे, लता ढेरे, वाघमारे ताई, युवती अध्यक्षा डॉ. प्रतिक्षा चव्हाण, युवक अध्यक्ष सरफराज शेख, अल्पसंख्याक सेलचे प्रसिद्धीप्रमुख लाडजी नदाफ, ज्येष्ठ नेते अल्ताफ बुऱ्हाण, उत्तर विधानसभा अध्यक्ष संजय जाबा, सोपान खांडेकर, सामाजिक न्याय सेल अध्यक्ष अजित पात्रे, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष संपन्न दिवाकर, ओबीसी सेल अध्यक्ष बिराप्पा बंडगर, व्हीजेएनटी सेल कार्याध्यक्ष अक्षय जाधव, दक्षिण विधानसभा पदाधिकारी अमित मोतेवार, बाळासाहेब मोरे, लखन गावडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

No comments:
Post a Comment