एल निनो च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपत्कालीन पीक नियोजनाचा अवलंब करावा
कृषी विभागाचे आवाहन
एल निनोमुळे पिकांच्या उगवण, वाढ व उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याने उपलब्ध पाऊस व पाण्याचा कार्यक्षम वापर करून उत्पादनातील संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी नियोजनबद्ध शेती व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
मान्सून उशिरा सुरू झाल्यास किंवा पेरणीस विलंब झाल्यास जुलैच्या पहिल्या आठवड्यात बाजरी, राळा, राजगिरा, मूग, तूर, हुलगा, सूर्यफूल, मटकी व सोयाबीन या पिकांची निवड करावी. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सूर्यफूल, तूर, हुलगा, राळा, एरंडी, बाजरी व सोयाबीन ही पिके घ्यावीत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सूर्यफूल, हुलगा, एरंडी व बाजरी, तर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात सूर्यफूल, एरंडी व बाजरी या पिकांना प्राधान्य द्यावे. विलंबित पेरणीच्या परिस्थितीत मूग, उडीद व सोयाबीन घेणे टाळावे, असेही विभागाने म्हटले आहे.
अल्प कालावधीत येणाऱ्या बाजरी, मूग, उडीद, तीळ, सूर्यफूल तसेच लवकर परिपक्व होणाऱ्या सोयाबीनच्या वाणांची निवड करावी. पेरणीनंतर पावसात खंड पडल्यास त्वरित आंतरमशागत, तण नियंत्रण, जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आच्छादन (मल्चिंग) तसेच आवश्यकतेनुसार जीवनरक्षक सिंचनाचा अवलंब करावा. पिकांच्या जोमदार वाढीसाठी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार विद्राव्य खतांची फवारणी करावी.
पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यास कमी पाण्यावर येणारी बाजरी, ज्वारी, मूग, उडीद, तीळ, तूर व चवळी यांसारख्या पिकांना प्राधान्य द्यावे. तसेच एकाच पिकावर अवलंबून न राहता आंतरपीक व मिश्रपीक पद्धतीचा अवलंब केल्यास जोखीम कमी होण्यास मदत होते. शेतातील उपलब्ध पाणी अधिक काळ साठवून ठेवण्यासाठी ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. जमिनीतील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर, पीक अवशेषांचे आच्छादन आणि वेळेवर आंतरमशागत करणेही महत्त्वाचे असल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे.
फळबागधारकांनी झाडांच्या बुंध्याभोवती आच्छादन करावे, ठिबक सिंचनाद्वारे काटकसरीने पाणी द्यावे आणि आवश्यकतेनुसार छाटणी करून पाण्याचा कार्यक्षम वापर करावा. शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान अंदाज, कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागाच्या शिफारशींचा आधार घेऊन पीक नियोजन करावे. तसेच पीक विमा योजनेचा लाभ घेऊन संभाव्य जोखमीपासून संरक्षण मिळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
एल निनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करून शास्त्रीय पद्धतीने आपत्कालीन पीक नियोजन, मृदा आर्द्रता संवर्धन आणि योग्य पीक व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास उत्पादनातील घट मोठ्या प्रमाणात कमी करता येईल. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी किंवा सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
.png)
No comments:
Post a Comment