करमाळा (कटूसत्य वृत्त):- शेतीची रात्रीची वीज सुरू करण्याच्या मागणीला अखेर यश आले असून, विद्यार्थी-पालकांच्या आंदोलनानंतर रात्रीची वीज सुरू करण्यात आल्याची माहिती नेरलेचे माजी सरपंच श्रीमंत औदुंबर राजेभोसले यांनी दिली.
करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात सुमारे ९० टक्के नागरिक शेतात वास्तव्यास आहेत. मात्र, शेतीची वीज रात्री दहा वाजेपर्यंत बंद असल्याने शेतात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत होता. सायंकाळी ६ ते १० ही विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची महत्त्वाची वेळ असताना वीज नसल्यामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. तसेच शेतकऱ्यांनाही जनावरांचा चारा, पाणी, दूध काढणे, स्वयंपाक आदी कामांसाठी अंधारात त्रास सहन करावा लागत होता. शिवाय सर्प व वन्यप्राण्यांचा धोकाही निर्माण होत होता.
या प्रश्नावर श्रीमंत औदुंबर राजेभोसले यांनी महावितरणचे अभियंता व तहसीलदार करमाळा यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर दि. ६ जुलै रोजी करमाळा येथे शेकडो विद्यार्थी व पालकांनी ठिय्या आंदोलन केले. आंदोलनादरम्यान कार्यकारी अभियंता, बार्शी यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधण्यात आला. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा व शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून ६ जुलैपासून वीज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
रात्रीची वीज सुरू झाल्यानंतर शेतकरी, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अनेक ठिकाणी पेढे वाटून व फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सहकार्य करणाऱ्या पत्रकार बंधू तसेच महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे औदुंबर राजेभोसले यांनी आभार मानले. तसेच पुन्हा वीज बंद करू नये, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

No comments:
Post a Comment