सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यात यंदा जून महिन्याच्या अखेरीस पावसाचे अत्यंत असमान वितरण झाले आहे. काही तालुक्यांत समाधानकारक पाऊस झाला असला, तरी माढा, माळशिरस आणि करमाळा तालुक्यांत पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या पूर्णपणे रखडल्या आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्याने केवळ २ टक्के क्षेत्रावरच खरिपाची पेरणी झाली आहे. चारा व पशुखाद्याची गरज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी मका पिकाला सर्वाधिक पसंती दिली असून, सुमारे २ हजार ८३३ हेक्टरवर मक्याची पेरणी झाली आहे.
जिल्ह्यात रविवारी (ता. २८) सरासरी १७.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोलापूर जिल्ह्याची जून महिन्यातील सरासरी पर्जन्यमान १०२.५ मिलिमीटर आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ७८.७ मिलिमीटर पाऊस झाल्याने जून महिन्याची सरासरी गाठता आलेली नाही.
रविवारी दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्वाधिक ४३.६ मिलिमीटर, तर पंढरपूर तालुक्यात ३३.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याउलट माळशिरस (५.७ मिलिमीटर), बार्शी (६.० मिलिमीटर), माढा (८.६ मिलिमीटर) आणि करमाळा (९.७ मिलिमीटर) तालुक्यांत अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. इतर तालुक्यांमध्ये उत्तर सोलापूरमध्ये २५.१ मिलिमीटर, सांगोला २२.२ मिलिमीटर, अक्कलकोट २०.० मिलिमीटर, मोहोळ १७.२ मिलिमीटर आणि मंगळवेढा तालुक्यात १३.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र ३ लाख ३७ हजार ९८६ हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ ५ हजार ४३७ हेक्टर (२ टक्के) क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी प्रामुख्याने उडीद (१,३१० हेक्टर), मका (२,८३३ हेक्टर), तूर (६३४ हेक्टर), सोयाबीन (२२३ हेक्टर), मूग (६७ हेक्टर), सूर्यफूल (४८ हेक्टर) तसेच खरीप ज्वारी व बाजरी (प्रत्येकी १ हेक्टर) या पिकांची पेरणी केली आहे.
- पुरेसा पाऊस झाल्याशिवाय किंवा जमिनीत किमान अर्धा फूट ओल निर्माण झाल्याशिवाय घाईघाईने खरिपाची पेरणी करू नये. पावसाचा अंदाज लक्षात घेऊनच पेरणी करावी. अन्यथा दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.
-शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

No comments:
Post a Comment