"आता भाजपाला जो त्रास होणार आहे, तो त्यांनी बघत राहावा" - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 2, 2026

"आता भाजपाला जो त्रास होणार आहे, तो त्यांनी बघत राहावा"

 "आता भाजपाला जो त्रास होणार आहे, तो त्यांनी बघत राहावा"

राज ठाकरेंची परखड टिप्पणी



मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी सुरू आहेत. ठाकरेंच्या सेनेतील सहा खासदारांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदेंच्या सेनेकडून विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला.

त्यामुळे उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील या घडामोडींवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्यामुळे राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.

या सर्व राजकीय घडामोडींवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य करत परखड मत मांडलं आहे. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. ‘आता भाजपाला जो त्रास होणार आहे, तो त्यांनी बघत राहावा. नरेंद्र मोदींमुळे सध्या भाजपा टीकून आहे’, अशी परखड टिप्पणी राज ठाकरे यांनी केली आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

“महाराष्ट्रात तीन वर्षांनंतर निवडणुका आहेत. पण आतापासूनच एसआयआरची प्रतिक्रिया सुरू करण्यात आली आहे. या एसआयआरचा सर्वात जास्त फटका पश्चिम बंगाल आणि बिहारला बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये तब्बल २७ लाख मते काढली गेली आणि ममता बॅनर्जी यांच्यासारख्या नेत्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे ही काही सरळ आणि साधी, सोपी गोष्ट नाही. सध्या देशात जे राजकारण सुरू आहे, ते चांगलं राजकारण सुरू नाही. खूप घाणेरडं आणि गलिच्छ राजकारण सुरू आहे. याचा फटका भविष्यात भारतीय जनता पक्षालाही बसणारच आहे”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“मुळात सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेलं नाही. प्रश्न असा आहे की आपण आता करत असलेली एखादी कृती ही भविष्यासाठी चुकीचा पायंडा पडू नये, याचं भान आपल्या नेत्यांना नसेल किंवा एखाद्या राजकीय पक्षांना नसेल तर मला पुढच्या पिढ्यांची जास्त चिंता वाटते”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

‘उद्या भाजपालाही अशाच प्रकारचा त्रास होईल’ : राज ठाकरे

“राजकारणात सत्ता येत असते आणि जात असते. पण शेवटी आपला महाराष्ट्र आणि देश आपण कुठे नेणार आहोत? आपण राजकारण कुठे नेणार आहोत? सध्या महाराष्ट्रात जे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे, ते खूप भयानक आणि गलिच्छ राजकारण सुरू आहे. हे काही चांगलं राजकारण नव्हे. उद्या सत्ता गेल्यानंतर भारतीय जनता पक्षालाही अशाच प्रकारचा त्रास होईल. तेव्हा भाजपा काय करेल? आपण काय करतोय, कुठपर्यंत जायचंय? याला काही मर्यादा आहेत की नाही?”, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

“भविष्यात भाजपालाही त्रास होईल…”,राज ठाकरे

“जेव्हा-जेव्हा सत्ताधाऱ्यांनी त्यांचे विरोधक संपवलेले आहेत, त्या-त्यावेळी त्यांच्यातच विरोधक तयार झालेले आहेत आणि मग त्यांनीच त्यांना संपवलेलं आहे. हीच प्रक्रिया भारतीय जनता पक्षात सुरू झालेली आहे. आता तुमच्यात जे विरोधक तयार झालेले आहेत, यामधून तुम्हाला जो त्रास होईल, तो तुम्ही पण बघत राहा, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. हा जगाचा इतिहास आहे, आणीबाणीच्या काळातही तेच झालं होतं. अनेकवेळा याच गोष्टी घडलेल्या आहेत”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

‘नरेंद्र मोदींमुळे भाजपा टीकून’

“प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही. प्रश्न विकले जाणाऱ्यांचा आहे. लोकांमध्ये या सर्व गोष्टींचा संताप आहे. सध्या जे काही सुरू आहे, ते चांगलं नाही. सध्या जे काही भाजपा टीकून आहे, ते फक्त नरेंद्र मोदींमुळे आहे. मग अशा परिस्थितीत तुम्ही अशा प्रकारचं राजकारण करत आहात? हे त्यांच्याही अंगाशी येणारच आहे. हे सगळं राजकारण कोणामुळे आणि कशासाठी सुरू आहे? हे राजकारण फक्त अमित शाह यांचं सुरू आहे. मी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की शिवसेनेचे ६ खासदार फोडले. मग ते ६ खासदार भाजपात का गेले नाही? टीएमसीचे खासदार फोडले, त्यांचा वेगळा गट का केला?”, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages