जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांची शरद पवारांनी घेतली भेट; पोलिसांच्या कारवाईवर टीका
नवी दिल्ली (वृत्त सेवा):- नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषण व आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज भेट घेतली. आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची त्यांनी विचारपूस केली आणि त्यांच्या मागण्या सविस्तर जाणून घेतल्या.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी, "आपल्या न्याय्य मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना काल पोलिसांनी दिलेली वागणूक लोकशाही मूल्यांना शोभणारी नाही," अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
पुढे ते म्हणाले की, भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचे व अधिकारांचे संरक्षण केले असून सरकार आणि प्रशासन हे जनतेप्रती उत्तरदायी आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांवर दडपशाही करण्याऐवजी त्यांच्या मागण्यांचा संवेदनशीलपणे विचार करून योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक आहे.
NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारांच्या निषेधार्थ विद्यार्थी जंतरमंतर येथे आंदोलन करत असून, त्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही शरद पवार यांनी व्यक्त केली.
.png)
No comments:
Post a Comment