"आम्हाला टीईटी, तुम्हाला मात्र गुवाहाटी!"; सोलापुरात शिक्षकांचा विराट मोर्चा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 10, 2026

"आम्हाला टीईटी, तुम्हाला मात्र गुवाहाटी!"; सोलापुरात शिक्षकांचा विराट मोर्चा

"आम्हाला टीईटी, तुम्हाला मात्र गुवाहाटी!"; सोलापुरात शिक्षकांचा विराट मोर्चा

टीईटी परीक्षा, बीएलओ नियुक्ती व अशैक्षणिक कामांना विरोध; हजारो शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा



सोलापूर (कटूसत्य वृत्त) : "रद्द करा... रद्द करा... टीईटी परीक्षा रद्द करा... बीएलओंची नेमणूक रद्द करा... आम्हाला टीईटी आणि तुम्हाला मात्र गुवाहाटी!" अशा घोषणांनी गुरुवारी सोलापूर शहर दणाणून गेले. टीईटी परीक्षा आणि मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकन (एसआयआर) मोहिमेसाठी शिक्षकांवर सोपविण्यात आलेली बीएलओची जबाबदारी रद्द करण्याच्या मागणीसाठी शहर व जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढत सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

राज्यातील शिक्षकांवर वाढत चाललेल्या अशैक्षणिक कामांच्या निषेधार्थ आणि "आम्हाला शिकवू द्या" या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी शाळाबंद आंदोलनाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

चार हुतात्मा पुतळ्यापासून जिल्हा परिषदेच्या पूनम गेटपर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो शिक्षक सहभागी झाले होते. पूनम गेट येथे मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारवर जोरदार टीका करत शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे तातडीने रद्द करून त्यांना पूर्णवेळ अध्यापनासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

शिक्षक सहकार संघटनेचे राज्य सरचिटणीस नीलेश देशमुख यांनी शिक्षकांचा अनुभव विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी वापरला जावा, प्रशासनाच्या इतर कामांसाठी नव्हे, असे स्पष्ट मत व्यक्त केले.

आंदोलनात शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष श्यामराव जवंजाळ, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष वीरभद्र यादवाड यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चामुळे वाहतूक विस्कळीत

चार हुतात्मा पुतळा ते जिल्हा परिषदेच्या पूनम गेटपर्यंतच्या मार्गावर हजारो शिक्षक सहभागी झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

सरकारकडून सकारात्मक संकेत

शिक्षकांच्या राज्यव्यापी आंदोलनाची दखल घेत सरकारने शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी तातडीने चर्चा सुरू केली आहे. शालेय शिक्षणमंत्र्यांसोबत प्राथमिक बैठक झाली असून, कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटी परीक्षा घेणे आणि यापुढे शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती न करणे या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. यासंदर्भात महसूल विभागासोबतही बैठक होणार असल्याची माहिती शिक्षक सहकार संघटनेचे राज्य सरचिटणीस नीलेश देशमुख यांनी दिली.

२०७१ शाळा बंद; ६,३७३ शिक्षक आंदोलनात

शाळाबंद आंदोलनाला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील २,८२५ शाळांपैकी २,०७१ शाळा बंद राहिल्या, तर ७५४ शाळा सुरू होत्या. जिल्ह्यातील ८,४८८ शिक्षकांपैकी ६,३७३ शिक्षकांनी आंदोलनात सहभाग घेतला, तर २,११५ शिक्षक शाळेत उपस्थित होते. महापालिकेच्या शाळांमध्ये मात्र अध्यापन सुरळीत सुरू होते.

मोर्चात सहभागी झालेल्या तसेच शाळेत उपस्थित राहिलेल्या शिक्षकांचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असून, शासनाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages