पेपरफुटीविरोधात करमाळ्यात नागरी कृती समितीचे आंदोलन; विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा
करमाळा (कटूसत्य वृत्त):- देशभरात विविध स्पर्धा परीक्षांमधील वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांच्या निषेधार्थ आणि दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत करमाळा तालुका नागरी कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा अन्याय थांबवून परीक्षाप्रक्रिया पारदर्शक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या NEET परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. अमोल दुरंदे आणि ॲड. सविता शिंदे यांनी केले. आंदोलकांनी वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप करत केंद्र सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणारे शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरणवादी सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांशी प्रशासनाने केलेल्या वागणुकीचाही निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, परीक्षाप्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व विश्वासार्ह करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, पेपरफुटी प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
या आंदोलनात डॉ. जयंत कापडी, औदुंबर राजेभोसले, गजानन ननवरे, मानसिंग खंडागळे, अंगद देवकाते, आबासाहेब टापरे, स्वप्निल जाधव, शंकर कुलकर्णी, डॉ. सुजीत शिंदे, ॲड. कोमल गोरे, ॲड. स्वाती सपकाळ, ॲड. योगेश शिंपी, ॲड. नवनाथ राखुंडे, ॲड. सौरव शिंपी यांच्यासह करमाळा परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

No comments:
Post a Comment