भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- महापौर कोंड्याल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 10, 2026

भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- महापौर कोंड्याल

 भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- महापौर कोंड्याल




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री संत गजानन महाराज (शेगाव) पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील भाविक व पालखीसोबत येणाऱ्या हजारो वारकऱ्यांना आवश्यक नागरी सुविधा सुरळीत उपलब्ध करून देण्यासाठी आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. बैठकीत पालखी मार्गावरील स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती, प्रकाश व्यवस्था, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, वाहतूक नियोजन, मुक्कामाच्या ठिकाणची व्यवस्था तसेच वारकऱ्यांसाठी करण्यात येणाऱ्या सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी स्थायी समिती सभापती सौ. रंजिता चाकोते, महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, उपायुक्त सोनाली यादव,नगरसेविका राजेश्री दोडमणी,सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर, नगर अभियंता सारिका आकूलवार, आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश चौगुले, कार्यकारी अभियंता (विद्युत) राजेश परदेशी, श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे स्थानिक प्रतिनिधी सुनील फाळके व सुनील कुलकर्णी यांच्यासह महानगरपालिकेचे सर्व विभागप्रमुख व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पालखी सोहळ्याचे स्थानिक प्रतिनिधींनी महानगरपालिकेकडून दरवर्षी पालखी सोहळ्यासाठी करण्यात येणाऱ्या नियोजनबद्ध सुविधा व सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी पाणी गिरणी येथील स्वागतस्थळी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी व फिरते स्वच्छता पथक नियुक्त करावे, पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी, मुक्कामाच्या दोन्ही ठिकाणी अतिरिक्त फोकस लाईटची व्यवस्था करावी, पालखी मार्गावर पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध ठेवावेत तसेच रुग्णवाहिकेची सुविधा कायम ठेवावी, अशा सूचना व मागण्या मांडण्यात आल्या.

बैठकीत महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले की, प्रतिवर्षी श्री संत गजानन महाराज (शेगाव) संस्थानची पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जात असताना सोलापूर शहरात दोन दिवस मुक्काम करते. या कालावधीत हजारो भाविक आणि पालखीसोबत मोठ्या संख्येने वारकरी शहरात येत असतात. त्यामुळे प्रत्येक भाविक व वारकऱ्याला कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करून सर्व नागरी सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात.

महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना पालखी मार्गाची संपूर्ण स्वच्छता करणे, रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविणे, मार्गालगत अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे, अखंड प्रकाश व्यवस्था ठेवणे, मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणी, पाण्याचे टँकर, मोबाइल स्वच्छतागृहे, नियमित स्वच्छता, अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी, आरोग्य पथक, रुग्णवाहिका, औषधोपचाराची प्राथमिक सुविधा तसेच आवश्यक त्या सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.

तसेच पालखीसोबत येणाऱ्या वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी स्वच्छ व सुरक्षित परिसर, पुरेशा प्रकाशाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा, स्वच्छतागृहांची देखभाल, कचरा संकलनासाठी विशेष पथके तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी आरोग्य व आपत्कालीन सेवा सज्ज ठेवण्याचे निर्देशही महापौरांनी दिले.

यावर्षी पालखी मार्गामध्ये काही ठिकाणी बदल झाल्यामुळे नव्याने समाविष्ट झालेल्या मार्गांवरही स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, प्रकाश व्यवस्था व इतर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे स्पष्ट निर्देश महापौरांनी दिले. तसेच महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी परस्पर समन्वय ठेवून वाहतूक, सुरक्षा व गर्दी व्यवस्थापन प्रभावीपणे हाताळावे, असेही त्यांनी सांगितले.

महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, "श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा हा श्रद्धा, सेवा आणि समन्वयाचा उत्सव आहे. सोलापूर शहरात येणाऱ्या प्रत्येक भाविक आणि वारकऱ्याला स्वच्छ, सुरक्षित व सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून पालखी सोहळा निर्विघ्न आणि यशस्वी होईल याची दक्षता घ्यावी. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक व वारकऱ्यांनी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करून शिस्तबद्ध पद्धतीने सोहळ्यात सहभागी व्हावे."

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages