सोलापुरात रोजगार व असंघटीत क्षेत्राच्या व्यापक सर्वेक्षणाला प्रारंभ : अचूक माहितीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात प्रथमच Periodic Labour Force Survey (PLFS) व Annual Survey of Unincorporated Sector Enterprises (ASUSE) या दोन महत्त्वपूर्ण सर्वेक्षणांना सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांच्या हस्ते माहिती पत्रकाचे विमोचन करून सर्वेक्षणाचा शुभारंभ करण्यात आला.
पहिल्यांदाच जिल्हास्तरीय सर्वेक्षण
महाराष्ट्र इन्स्टीट्यूशन फॉर ट्रान्सफॉरमेशन (मित्रा) यांच्या सहकार्याने एप्रिल २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राज्यात ही सर्वेक्षणे राबविली जाणार आहेत. रोजगार, बेरोजगारीचे प्रमाण आणि असंघटीत क्षेत्राबाबत जिल्हानिहाय आकडेवारी मिळवणे हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे. सोलापूर जिल्ह्यात PLFS साठी नागरी व ग्रामीण भागातील १२०, तर ASUSE साठी ६४ असे एकूण १८४ नमुना गावे/ब्लॉक निवडण्यात आले आहेत.
नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी नागरिकांना प्रगणकांना अचूक व सत्य माहिती देण्याचे आवाहन केले. उप आयुक्त संगीता मोरे म्हणाल्या, “शास्त्रीय नमुना निवड पद्धतीनुसार निवडक कुटुंबे व आस्थापनांचे सर्वेक्षण होणार आहे. ही कुटुंबे संपूर्ण समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे प्रत्येकाची माहिती मौल्यवान आहे. संकलित माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.” यावेळी सांख्यिकी अधिकारी दिनकर बंडगर व कर्मचारी उपस्थित होते.
सर्वेक्षणाचे महत्त्व
या सर्वेक्षणाद्वारे रोजगाराची स्थिती, श्रमशक्ती सहभाग दर, स्वयंरोजगार, लघु व असंघटीत बिगर कृषी उद्योगांची स्थिती, कामगारांचे उत्पन्न यासंबंधीची सांख्यिकीय माहिती संकलित होणार आहे. या आकडेवारीच्या आधारे जिल्हास्तरीय विकास आराखडे तयार करणे, रोजगारविषयक धोरणे निश्चित करणे, उद्योग व गुंतवणुकीला चालना देणे व राज्याच्या-देशाच्या विकासाचे अचूक चित्र समोर आणणे शक्य होणार आहे.

No comments:
Post a Comment