चलवादी शिक्षण संस्थेच्या वतीने लाखो भाविकांचे पुण्यात अगत्यपूर्वक स्वागत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 10, 2026

चलवादी शिक्षण संस्थेच्या वतीने लाखो भाविकांचे पुण्यात अगत्यपूर्वक स्वागत

 चलवादी शिक्षण संस्थेच्या वतीने लाखो भाविकांचे पुण्यात अगत्यपूर्वक स्वागत

वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील तृप्ती सदैव उर्जादायक-ऍड.रेणुका चलवादी



 पुणे (कटूसत्य वृत्त):- 'ज्ञानोबा-तुकाराम' आणि 'विठ्ठल विठ्ठल' अशा विठू नामाच्या जयघोषाने अवघी संतभूमी पुणे नगरी दुमदुमून गेली आहे. आषाढी वारीच्या सोहळ्यानिमित्त पुण्यात दाखल झालेल्या लाखो वारकरी भाविकांचे स्वागत करण्यासाठी अवघे शहर सज्ज झाले असतानाच, चलवादी शिक्षण संस्थेच्या वतीने यंदाही माऊलींच्या लाडक्या वारकऱ्यांची सेवा करण्याची आपली दैदिप्यमान परंपरा मोठ्या भक्तीभावाने आणि अगत्यपूर्वक कायम ठेवण्यात आली.

विश्रांतवाडी येथील आळंदी रोडवरील एचडीएफसी बँकेसमोर, चलवादी शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष तथा भाजप-आरपीआय युतीच्या धडाडीच्या कार्यकर्त्या ऍड.रेणुकाताई चलवादी-शिर्के यांच्या वतीने पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी मैलोन्मैल चालणाऱ्या वारकऱ्यांच्या सुविधेसाठी त्यांना उपयोगी अशा बॅग्ज, बिस्किटे आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचे वाटप करून त्यांची मनोभावे सेवा करण्यात आली. याप्रसंगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी आणि सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शिर्के, आकाश चलवाडी  प्रामुख्याने उपस्थित होते.

अनेक दिवसांचा पायी प्रवास करून थकलेल्या, पण विठ्ठल भेटीच्या ओढीने चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असणाऱ्या या वारकरी माऊलींना पाहून आमचे मन भरून आले. त्यांच्या पायातील चपला झिजतात, पण विठ्ठलाप्रती असलेली श्रद्धा कधीच कमी होत नाही. अशा या संत कल्पवृक्षाची सेवा करण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील तृप्ती सदैव उर्जा देणारी असते, असे प्रतिपादन ऍड.रेणुका चलवादी यांनी व्यक्त केले.

वारी ही महाराष्ट्राची केवळ परंपरा नाही, तर तो आपल्या संस्कृतीचा प्राण आहे. डोक्यावर तुळशीवृंदावन, हाती टाळ आणि मुखात विठ्ठल नाम घेऊन ऊन-पावसाची फिकीर न करता पंढरीची वाट धरणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करणे हीच आमच्यासाठी खरी ईश्वर सेवा आहे. ही पवित्र परंपरा आमच्या शिक्षण संस्थेने अनेक वर्षांपासून जपली असून, ती पुढेही अशीच निरंतर सुरू राहील, असे प्रतिपादन डॉ.हुलगेश चलवादी यांनी केले.लाखो भाविकांच्या अथांग सागरात, चलवादी शिक्षण संस्थेच्या वतीने सर्वांनी अत्यंत आपुलकीने आणि श्रद्धेने प्रत्येकाला मदतीचा हात दिला. वारीच्या या सोहळ्यात सेवाकार्याचा हा अनोखा त्रिवेणी संगम यावेळी चर्चेचा विषय ठरला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages