नाम साधना मॉडर्न इंग्लिश स्कूल व महात्मा गांधी विद्यालयाची संयुक्त भक्तिमय दिंडी संपन्न
करमाळा (कटूसत्य वृत्त):- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त नाम साधना मॉडर्न इंग्लिश स्कूल व महात्मा गांधी विद्यालय, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली भव्य वारकरी दिंडी अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाली. टाळ-मृदंगाच्या निनादाने, हरिनामाच्या अखंड गजराने आणि "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषाने संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला.
वारकरी वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी हातात भगवे पताके, तुळशी वृंदावन, टाळ-मृदंग घेऊन पारंपरिक दिंडीत सहभाग नोंदविला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संतांच्या अभंगांचे गायन करत विद्यार्थ्यांनी समाजात भक्ती, समता, बंधुता, स्वच्छता, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश दिला.
या प्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक विश्वस्त शंभूराजे जगताप, विश्वस्त वैभवराजे जगताप, प्राचार्य अनिस बागवान, पर्यवेक्षक महेश कांबळे तसेच सौ. नवले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संतांच्या विचारांचे आचरण करून आदर्श नागरिक बनण्याचे आवाहन केले.
दिंडीमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वारकरी परंपरेचा समृद्ध वारसा, भारतीय संस्कृतीची ओळख आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता आले.
"शिक्षणासोबत संस्कार आणि संस्कृतीचे जतन हीच आमची परंपरा" या ध्येयाला साजेसा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकास पात्र ठरला. संपूर्ण कार्यक्रम भक्ती, शिस्त आणि उत्साहाचे प्रेरणादायी दर्शन घडविणारा ठरला.

No comments:
Post a Comment