तंत्रज्ञानाशी सुसंगत बँकिंग काळाची गरज- खडके - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 28, 2026

तंत्रज्ञानाशी सुसंगत बँकिंग काळाची गरज- खडके

 तंत्रज्ञानाशी सुसंगत बँकिंग काळाची गरज- खडके

मनोरमा बँकेच्या अंत्रोळकर नगर शाखेचे उद्घाटन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- देशातील नागरी सहकारी बँकांवर सामान्य नागरिकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत असून, ग्राहकांना अत्याधुनिक डिजिटल सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. सहकार क्षेत्राची ताकद सामान्य माणसापर्यंत पोहोचण्यात आहे. बदलत्या बँकिंग व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा स्वीकार करून ग्राहककेंद्रित सेवा देणाऱ्या सहकारी बँकाच भविष्यात यशस्वी ठरतील, असे प्रतिपादन कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष संजीव खडके यांनी केले.
   रविवारी,होटगी रस्त्यावरील मनोरमा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अंत्रोळकर नगर येथील ११व्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते ऑनलाइन माध्यमातून प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे होते.
यावेळी लोकमंगल बँकेचे अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख, पुणे पीपल्स मल्टीस्टेट बँकेचे अध्यक्ष श्रीधर गायकवाड, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मुकुंद पवार, उपनिबंधक उमेश पवार, जिल्हा विशेष लेखापरीक्षक (वर्ग-१) व्ही. व्ही. डोके, मनोरमा मल्टीस्टेटच्या अध्यक्षा शोभा मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा कुलकर्णी, डॉ. ऋचा मोरे-पाटील, डॉ. सुमित मोरे, धनश्री परिवाराचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंखे, सांगलीचे नायब तहसीलदार जितेंद्र मोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
खडके म्हणाले, जगभरात सहकार चळवळीचे महत्त्व सातत्याने वाढत आहे. सुमारे ९० हजार सहकारी संस्था कार्यरत असून, ४११ कोटी सदस्य या व्यवस्थेशी जोडले गेले आहेत. जागतिक स्तरावर सहकारी संस्थांची मालमत्ता चार ट्रिलियन डॉलर इतकी आहे. भारतातील नागरी सहकारी बँकांची एकूण ठेव सहा लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून, सामान्य नागरिकांपर्यंत आर्थिक सेवा पोहोचविण्याची सर्वाधिक क्षमता सहकार क्षेत्रात आहे. बदलत्या काळानुसार मोबाईल बँकिंग, डिजिटल व्यवहार आणि तंत्रज्ञानाधारित सुविधा अधिक सक्षम करणे आवश्यक असून, ग्राहकांच्या गरजांनुसार सेवा देणाऱ्या सहकारी बँकांचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविकात डॉ. ऋचा मोरे-पाटील यांनी बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. मागील सलग आठ वर्षे बँकेने शून्य टक्के एनपीएची कामगिरी कायम राखली असून, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून एफएसएम दर्जा आणि आदर्श बँक पुरस्कार प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. बँकेची व्यवसायवाढ आता १,१७० कोटी रुपयांच्या टप्प्याकडे वाटचाल करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
शोभा मोरे यांनी स्वागतपर भाषणात बँकेने कोअर बँकिंग प्रणाली प्रभावीपणे कार्यान्वित केली असून, तंत्रज्ञानाचा वेगाने स्वीकार करणाऱ्या बँकिंग क्षेत्रात सतत अद्ययावत राहण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
आमदार  देशमुख म्हणाले, आज सिबिल स्कोअरच्या आधारे कर्ज वितरण अधिक पारदर्शक झाले आहे. ग्राहकांना कमी व्याजदरात कर्ज मिळावे, अशी अपेक्षा असते. सहकारी बँकेचा खरा मालक सभासद असल्याने त्यांचा विश्वास जपणे महत्त्वाचे आहे. लोकमंगल बँक आणि मनोरमा परिवाराने भविष्यात एकत्रितपणे काम केल्यास सोलापूरच्या सहकार क्षेत्रात मोठी क्रांती घडू शकते. स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मितीतही सहकारी बँकांची महत्त्वाची भूमिका राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुणे पीपल्स मल्टीस्टेट बँकेचे अध्यक्ष श्रीधर गायकवाड आणि व्ही. व्ही. डोके यांनीही सहकार क्षेत्रातील बदलत्या आव्हानांवर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात श्रीकांत मोरे यांनी मनोरमा बँकेच्या तीन दशकांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. सहकार क्षेत्रात अनेक अडचणींवर मात करत बँकेने प्रगती साधली असून, ठेवींची गुणवत्ता, कमी खर्चातील ठेवी वाढविणे, एनपीए नियंत्रणात ठेवणे आणि शाश्वत आर्थिक व्यवस्थापन या बाबींवर विशेष भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पल्लवी पवार यांनी सूत्रसंचालन, तर उपाध्यक्ष संतोष सुरवसे यांनी आभार प्रदर्शन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages