सोलापूर जिल्हा परिषदेच्या ३ आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय मानांकन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 28, 2026

सोलापूर जिल्हा परिषदेच्या ३ आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय मानांकन

 सोलापूर जिल्हा परिषदेच्या ३ आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय मानांकन

 आता गावातच मिळणार शहरासारखे उपचार



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना आता गावपातळीवरच मोफत, सुरक्षित आणि उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दिल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकनात' (एनक्यूएएस) सोलापूर जिल्हा परिषदेच्या तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांनी राष्ट्रीय दर्जा पटकावला आहे.

पहिल्यांदाच जिल्हा परिषदेला प्रथमच हा बहुमान मिळाला आहे. विशेष म्हणजे, यंदा जिल्हा शल्यचिकित्सक आणि महानगरपालिकेच्या आरोग्य संस्थांमधून निवड झाली नसताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ही कामगिरी केली आहे.

रुग्णकेंद्रित सेवा, स्वच्छता, सुरक्षितता आणि प्रभावी व्यवस्थापन या निकषांवर हे मानांकन दिले जाते. या मूल्यांकनात दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणारे मुस्ती (८४.३१ टक्के), तसेच मोहोळ तालुक्यातील पाटकुल केंद्राअंतर्गत येवती (८३.७३ टक्के) आणि अंकोली केंद्राअंतर्गत औंधी (८२ टक्के) या आयुष्मान आरोग्य मंदिरांनी यश मिळवले आहे.

या मानांकनामुळे उपकेंद्र स्तरावर संसर्गमुक्त उपचार, औषधे व उपकरणांचे योग्य व्यवस्थापन आणि रुग्ण समाधानात वाढ होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मानांकन प्राप्त संस्थांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत विशेष प्रोत्साहन निधी मिळणार आहे. या निधीतून आरोग्य केंद्रांमध्ये आधुनिक उपकरणे आणि पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जातील. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना चांगल्या उपचारांसाठी शहरात न धावता गावातच विश्वासार्ह सुविधांचा लाभ घेता येईल.

पालकमंत्री जयकुमार गोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन व आरोग्य सभापती चैतन्यसिंह केदार सावंत यांच्या नियंत्रणाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, सहायक संचालक डॉ. मोहन शेगर, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे मिळाले आहे.

चौकट-
“जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांना एनक्यूएएस मानांकन मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे. जनतेला गावातच दर्जेदार आणि सुरक्षित आरोग्य सेवा देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील.”- कुशल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages