दुसऱ्या विवाहासाठी दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या हत्येचा प्रयत्न? - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 28, 2026

दुसऱ्या विवाहासाठी दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या हत्येचा प्रयत्न?

 दुसऱ्या विवाहासाठी दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या हत्येचा प्रयत्न?

पत्नीसह पाच जणांविरुद्ध न्यायालयात खाजगी फौजदारी तक्रार




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दुसऱ्या विवाहातील अडसर दूर करण्यासाठी दोन वर्षांच्या स्वतःच्या चिमुकल्या मुलाला छतावरून ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करत पतीने पत्नीसह तिच्या कुटुंबातील पाच जणांविरुद्ध सोलापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात खाजगी फौजदारी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

फिर्यादी विक्रम श्रीनिवास कामूर्ती यांनी अॅड. श्रीनिवास कटकुर यांच्यामार्फत सोलापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती जे. पी. पाटील यांच्या न्यायालयात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ अंतर्गत ही तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, विक्रम कामूर्ती आणि नयना माचेर्ला यांचा विवाह ४ मे २०२२ रोजी झाला होता. या दाम्पत्याला 'अवनीश' नावाचा मुलगा आहे. वैवाहिक वाद निर्माण झाल्यानंतर पत्नी पाच महिन्यांची गर्भवती असताना माहेरी निघून गेली. त्यानंतर तिला पुन्हा नांदण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले असून, सोलापूर कौटुंबिक न्यायालयात 'नांदायला यावे' यासाठी स्वतंत्र दावा दाखल करण्यात आला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादीच्या आरोपानुसार, आरोपी पत्नीला घटस्फोट न घेता दुसरा विवाह करायचा असल्याने दोन वर्षांचा मुलगा अवनीश हा त्यासाठी अडसर ठरत होता. त्यामुळे पत्नी नयना माचेर्ला, मेव्हणा नितीन माचेर्ला आणि मेव्हणी अमृता माचेर्ला यांनी संगनमत करून मुलाला घराच्या छतावरून खाली ढकलून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.

या घटनेत चिमुकल्या अवनीशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्या मेंदूत रक्ताच्या गाठी (हेमॅटोमा) झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. यासंदर्भातील वैद्यकीय उपचारांची कागदपत्रेही न्यायालयात सादर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात नयना जगदीश माचेर्ला (पत्नी), जगदीश अंबादास माचेर्ला (सासरे), लता जगदीश माचेर्ला (सासू), नितीन जगदीश माचेर्ला (मेव्हणा) आणि अमृता जगदीश माचेर्ला (मेव्हणी) यांना आरोपी करण्यात आले आहे. सर्व आरोपी हे एमआयडीसी, अक्कलकोट रोड, सोलापूर येथील रहिवासी असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

स्थानिक पोलिसांनी योग्य दखल घेतली नसल्याचा आरोप करत फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९ (खुनाचा प्रयत्न), कलम ६१(२) (गुन्हेगारी कारस्थान), तसेच कलम ३५१ व ३(५) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय सर्व आरोपींविरुद्ध समन्स किंवा वॉरंट जारी करण्यात यावे, त्यांना कठोर शिक्षा सुनावण्यात यावी, जखमी बालकाच्या पुढील उपचारासाठी पाच लाख रुपयांचा दंड आकारण्यात यावा आणि बालकाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही न्यायालयाकडे करण्यात आली आहे.

या प्रकरणात फिर्यादीच्या वतीने अॅड. श्रीनिवास कटकुर आणि अॅड. आकाश आयंची हे काम पाहत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages