चलवादी शिक्षण संस्था: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
डॉ.हुलगेश चलवादी यांनी वाहिली आदरांजली
पुणे (कटूसत्य वृत्त):- वंचित, शोषित आणि कामगारांच्या हक्कांसाठी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून क्रांतीची मशाल पेटवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि बहुजन नेते डॉ.हुलगेश चलवादी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. चलवादी शिक्षण संस्थेच्या वतीने लोकशाहिरांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच येरवडा येथील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन परिसरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करीत अभिवादन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल त्रिपाठी तसेच स्वप्नील शिर्के प्रामुख्याने उपस्थित होते.
अण्णाभाऊ केवळ साहित्यिक नव्हते, तर ते शोषितांच्या वेदनेला वाचा फोडणारे युगपुरुष होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांच्या शाहिरीने मराठी मनाला जागे करण्याचे मोठे कार्य केले. त्यांचे साहित्य आजही समाजातील शेवटच्या घटकाला संघर्षाची, स्वाभिमानाची प्रेरणा देते. अण्णाभाऊंनी उपेक्षित आणि कष्टकऱ्यांच्या जीवनातील सत्य जगासमोर मांडले, म्हणूनच त्यांचे विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत.
अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून आपसातील मतभेद विसरून दोन्ही बाजूंनी चर्चेद्वारे सुवर्णमध्य शोधणे काळाची गरज आहे; कारण अंतर्गत वादामुळे मूळ हक्क आणि बहुजन चळवळी कमकुवत होण्याचा धोका असतो. केवळ आणि केवळ संघटित राहूनच आपण आपले हक्क सुरक्षित ठेवू शकतो, त्यामुळे उपेक्षित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी वैचारिक मतभेद बाजूला सारून एकीने आणि एकजुटीने राहणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन यावेळी डॉ.चलवादी यांनी केले.
अण्णाभाऊ साठे यांनी दिलेल्या समतेच्या आणि न्यायाच्या संदेशावर चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना याप्रसंगी डॉ.चलवादी यांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी लोकशाहीरांच्या पुरोगामी आणि समतावादी विचारांचा जागर करीत बहुजन समाज आणि कामगारांच्या हक्कांसाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा आणि त्यांच्या न्याय्य हक्कासाठी संघर्ष करण्याचा खंबीर निर्धार यावेळी करण्यात आला.


No comments:
Post a Comment