ए.आय.चा वापर गरजेपुरताच करा; त्याचे गुलाम बनू नका : माजी सरन्यायाधीश भूषण गवई - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 6, 2026

ए.आय.चा वापर गरजेपुरताच करा; त्याचे गुलाम बनू नका : माजी सरन्यायाधीश भूषण गवई

 ए.आय.चा वापर गरजेपुरताच करा; त्याचे गुलाम बनू नका : माजी सरन्यायाधीश भूषण गवई

सोलापूर बार असोसिएशनच्या लीगल कॉन्फरन्समध्ये वकिलांना मार्गदर्शन



सोलापूर (कटूसत्य वृत्त) : न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) उपयुक्त ठरत असली तरी त्यावर अति अवलंबून राहू नये. गरजेनुसार ए.आय.चा वापर करावा, त्याचे गुलाम बनू नका; उलट ए.आय.ला आपल्या कामाचे साधन बनवा, असे आवाहन भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.

सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने रविवारी हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित एकदिवसीय कायदेविषयक चर्चासत्र (लीगल कॉन्फरन्स) मध्ये ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

गवई म्हणाले की, दिवसेंदिवस कायदे बदलत आहेत, न्यायालयांचे नवे निकाल समोर येत आहेत. त्यामुळे प्रत्येक वकिलाने सातत्याने अद्ययावत राहणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्याचा प्रभावी वापर करावा, मात्र अंतिम निर्णयासाठी स्वतःची कायदेशीर समज, अभ्यास आणि विवेक यांनाच प्राधान्य द्यावे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब जाधव होते. यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजामोद्दिन जे. जमादार, मिलिंद जाधव, माजी न्यायमूर्ती विनय जोशी, न्यायमूर्ती मेहरज पठाण, सचिव बसवराज हिंगमिरे, रजाक शेख, मिलिंद थोबडे, जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा, एम. के. प्रसाद आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक अॅड. बाबासाहेब जाधव यांनी केले. यावेळी महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अॅड. मिलिंद थोबडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

परिषदेत विविध कायदेविषयक विषयांवर न्यायमूर्ती आणि वरिष्ठ विधिज्ञांनी मार्गदर्शन केले. या परिषदेला उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश, वरिष्ठ विधिज्ञ, महाराष्ट्रातील विविध बार असोसिएशनचे पदाधिकारी, वकील, विधी महाविद्यालयांचे प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट : खंडपीठाच्या उल्लेखावर सभागृहात हशा

भूषण गवई यांनी भाषणादरम्यान कोल्हापूर येथे खंडपीठ स्थापन करण्याच्या मागणीचा उल्लेख केला. "सोलापूरला हे खंडपीठ व्हावे याला माझा विरोध होता," असे मिश्कीलपणे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. त्यानंतर त्यांनी स्पष्ट केले की, कोल्हापूर येथे खंडपीठ सुरू झाल्याने नागरिकांची मोठी सोय झाली असून भविष्यात ते पूर्णवेळ खंडपीठ व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू राहतील.

चौकट : विठ्ठलाच्या वेशातील सत्काराने गवई भारावले

कार्यक्रमात माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. जिल्ह्यातील अकरा तालुका बार असोसिएशननेही त्यांचा सत्कार केला. विशेष म्हणजे, पंढरपूर बार असोसिएशनने विठ्ठलाचा पोशाख, गळ्यात तुळशीहार आणि वीणा अर्पण करून केलेल्या अनोख्या सत्कारामुळे गवई भावूक आणि भारावून गेले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages