स्थानिकांचे व्यवसाय हटवून परप्रांतियांना जागा देणार का? - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 6, 2026

स्थानिकांचे व्यवसाय हटवून परप्रांतियांना जागा देणार का?

                    स्थानिकांचे व्यवसाय हटवून परप्रांतियांना जागा देणार का?

मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा संतप्त सवाल; बाधित व्यावसायिकांना आर्थिक मदत



पंढरपूर (कटूसत्य वृत्त) : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने राबविलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. अतिक्रमण हटविण्यास विरोध नसला, तरी संबंधित व्यावसायिकांशी कोणतीही बैठक न घेता, त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी न देता हुकूमशाही पद्धतीने कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

पत्रकार परिषदेत बोलताना धोत्रे म्हणाले की, वर्षानुवर्षे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या स्थानिक तरुणांची दुकाने आणि व्यवसाय उद्ध्वस्त करण्यात आले. "स्थानिकांना हटवून बाहेरून येणाऱ्या परप्रांतियांना वारीत व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होत नाही ना, याची चौकशी झाली पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी कारवाईमुळे व्यवसाय बंद पडलेल्या चंद्रशेखर मिरजकर, रतन काळे, सूरज पेंडाल आणि कबीरकुमार कदम या व्यावसायिकांना मनसेच्या वतीने प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. या प्रसंगी नगरसेवक संजय बंदपट्टे, किरणराज घाडगे, लोकेश यादव आणि प्रसाद कळसे उपस्थित होते.

धोत्रे यांनी नगरपालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, "नगरपालिकेकडे कायमस्वरूपी अतिक्रमण विरोधी पथक असताना अतिक्रमणे झालीच कशी? नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत. पूर्वी स्थानिक फेरीवाल्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला होता. अनेक फेरीवाल्यांची अधिकृत नोंदणीही नगरपालिकेकडे आहे. अशा नोंदणीकृत व्यावसायिकांनाच अतिक्रमणधारक ठरवून कारवाई करणे योग्य नाही," असे स्पष्ट केले.

चौकट : अवैध धंद्यांवरही कारवाई करा

शहरातील काही प्रभावशाली व्यक्ती शासकीय व खुल्या जागांवर अतिक्रमण करून तेथील झोपड्या व खोकीधारकांकडून पैसे वसूल करीत असल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना दिलीप धोत्रे म्हणाले की, अशा अतिक्रमणांमधून सुरू असलेले अवैध धंदे प्रशासनाने तातडीने उद्ध्वस्त करावेत. हातावर पोट असलेल्या गोरगरीब व्यावसायिकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यासाठी पर्यायी जागा व पुनर्वसनाचा विचार करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages