करमाळा शहरात संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखीचे जंगी स्वागत; जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी, वारकऱ्यांसाठी भोजन व्यवस्था - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 20, 2026

करमाळा शहरात संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखीचे जंगी स्वागत; जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी, वारकऱ्यांसाठी भोजन व्यवस्था

करमाळा शहरात संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखीचे जंगी स्वागत; जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी, वारकऱ्यांसाठी भोजन व्यवस्था



 करमाळा(कटूसत्य वृत्त):- संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आज करमाळा शहरात भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखी शहरात दाखल होताच भाविकांनी जयघोष करत पालखीचे दर्शन घेतले. यावेळी जेसीबीच्या साहाय्याने पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि "ज्ञानोबा-तुकाराम"च्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील राशीन पेठ येथे वारकऱ्यांसाठी महाप्रसाद व भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. मोठ्या संख्येने वारकऱ्यांनी भोजनाचा लाभ घेतला. विविध सेवाभावी संस्था, स्वयंसेवक आणि नागरिकांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वारी परंपरेप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली.
भोजनानंतर संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. पालखीचा आजचा मुक्काम जेऊर येथे होणार असून त्यानंतरचा मुक्काम कंदर येथे नियोजित आहे.
पालखी करमाळा शहरात आगमन झाल्यानंतर तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभागांच्या वतीने वारकऱ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच इतर मूलभूत सुविधांची योग्य अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे पालखी सोहळा शांततेत, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
यंदाही करमाळा शहरातील नागरिकांनी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहपूर्ण स्वागत करत वारी परंपरेप्रती असलेली आपली श्रद्धा आणि सेवाभाव जपल्याचे चित्र पाहायला मिळाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages