विठ्ठलभक्तीचा सेवामय वारसा; सुरवसे कुटुंबाकडून २०० वारकऱ्यांना महाप्रसाद
करमाळा(कटूसत्य वृत्त):- श्री क्षेत्र शनेश्वर देवस्थान, खरटगाव येथून आषाढी वारीसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी निघालेल्या पायी दिंडी सोहळ्याचे करमाळा शहरात भक्तिमय वातावरणात भावपूर्ण स्वागत करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिंडीचे करमाळ्यात आगमन झाल्यानंतर सुरवसे कुटुंबाच्या वतीने सुमारे २०० वारकऱ्यांसाठी महाप्रसाद (भोजन) व्यवस्था करण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात वारकऱ्यांनी या भोजनाचा लाभ घेतला.
या सेवेमागे दिलीप सुरवसे यांची विठ्ठलभक्ती आणि सेवाभावाची प्रेरणादायी परंपरा आहे. दिलीप सुरवसे हे दर महिन्याला श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी नियमित जात असत. विठ्ठलावरील अपार श्रद्धेतून त्यांनीच वारकऱ्यांसाठी भोजन सेवा सुरू करण्याचा संकल्प केला. त्यांच्या पुढाकारातून सुरू झालेली ही सेवा आज १३ वर्षांपासून अखंड सुरू असून, त्यांच्या पश्चात सुरवसे कुटुंबीयांनी हा सेवेचा वसा तितक्याच श्रद्धेने आणि समर्पणाने पुढे चालू ठेवला आहे.
दरवर्षी दिंडी करमाळ्यात दाखल होताच सुरवसे कुटुंब संपूर्ण नियोजन करून वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करते. कुटुंबातील सर्व सदस्य या सेवेत उत्स्फूर्तपणे सहभागी होत असून, वारकऱ्यांची मनोभावे सेवा करण्याला ते विठ्ठलाची सेवा मानतात. त्यांच्या या कार्यामुळे वारकरी संप्रदायात त्यांच्याबद्दल विशेष आदराची भावना निर्माण झाली आहे.
भोजनानंतर "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल"च्या जयघोषात दिंडीने श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने पुढील प्रवास सुरू केला. दिंडीचा पुढील मुक्काम करमाळा तालुक्यातील सरफडोह येथे असून, त्यानंतर दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.
वारकरी परंपरेतील सेवा, समर्पण आणि भक्तीचा सुंदर संगम करमाळा शहरात यानिमित्त अनुभवायला मिळाला. दिलीप सुरवसे यांनी सुरू केलेल्या या सेवेला त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेली सातत्यपूर्ण साथ ही समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, वारकऱ्यांनीही सुरवसे कुटुंबाच्या सेवाभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

No comments:
Post a Comment